जर्सी नंबर ७ आणि सेमीफायनलमध्ये रनआऊट, भारतीय चाहत्यांच्या वाट्याला पुन्हा तो दुर्देवी क्षण

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDW vs AUSW) संघात झालेल्या महिला टी२० विश्वचषक २०२३च्या (Womens T20 World Cup 2023)उपांत्य फेरीत (Semi Final) सामन्यात भारतीय संघाला ५ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवासह भारतीय संघाचे टी२० विश्वचषकातील आव्हानही संपुष्टात आले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने निर्धारित २० षटकात १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ १६७ धावाच करू शकला. या सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेट चाहत्यांना एका जुन्या आणि दुर्देवी क्षणाची आठवण झाली.

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) ही उपांत्य फेरी सामन्यात धावबाद झाली आणि भारतीय चाहत्यांच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या आशा मावळल्या. अगदी असाच प्रसंग यापूर्वी २०१९ सालच्या वनडे विश्वचषकात पाहायला मिळाला होता.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात एके काळी भारतीय संघ विजयाकडे वाटचाल करत होता, मात्र कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (५२ धावा) धावबादने सामना उलटला. भारतीय डावाच्या १५व्या षटकात दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात हरमनप्रीत धावबाद झाली. पाहिले तर, हरमनप्रीत कौर खूप दुर्दैवी राहिली आणि दुसरी धाव घेताना बॅट अडकली ज्यामुळे ती क्रीजपर्यंत पोहोचू शकली नाही. हरमनप्रीत खेळत असताना भारताला ३३ चेंडूत फक्त ४१ धावांची गरज होती, पण तिची विकेट हा टर्निंग पॉइंट ठरला.

हरमनप्रीत कौरच्या धावबादमुळे चाहत्यांना भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीची (MS Dhoni) आठवण झाली आहे. एमएस धोनी २०१९च्या विश्वचषक उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध धावबाद झाला होता. त्या सामन्यात भारतासमोर २४० धावांचे लक्ष्य होते आणि धोनी ५० धावांवर फलंदाजी करत होता. त्यानंतर मार्टिन गप्टिलच्या थेट थ्रोवर धावबाद झाला. धोनीच्या रनआउटनंतर भारताने तो सामनाही गमावला. आता अर्धशतक झळकावल्यानंतर हरमनप्रीतही धोनीप्रमाणे धावबाद झाल्याने भारतीय चाहत्यांचे स्वप्न भंगले.

विशेष म्हणजे, दोघेही विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यातच धावबाद झाले आहेत. तसेच दोघांचा जर्सी क्रमांकही (०७ जर्सी नंबर) समान आहे.