महिला प्रत्येक क्षेत्रात आल्यास भारत देश प्रगतीपथावर जाईल – कपिल देव

पूणे – भारत देशातील महिला या खूप मेहनती ,कर्तुत्ववान आहेत त्यांच्याकडे  विविध प्रकारची गुणवत्ता आहे त्या जर विविध क्षेत्रात पुढे आल्या तर भारत देश प्रगतीचे शिखर गाठले असा विश्वास जागतिक क्रिकेटपटू कपिल देव(Kapil Dev) याने पुण्यातील फिक्की(FICCI) च्या FLO महीला विंग आयोजित महिला उद्योजिका ना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित  एका परिषदेत व्यक्त केला.

पुढे ते म्हणाले की ,देशासाठी क्रिकेट खेळणे हे कधीच प्रेशर वाटले नाही तर ते कायमच आनंददायी आणि प्रेरणादायी होते. जीवनात यशस्वी होण्यासाठी कायम जिंकण्याचा विचार करा, स्वतःवर प्रेम करा, प्रामाणिकपणे काम करा जीवनाच्या खेळात नक्कीच जिंकाल असा विश्वास ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांनी व्यक्त केला. महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी फिक्की महिला विंगच्या वतीने क्रिकेटपटू कपिलदेव यांनी पुण्यात मुक्त संवाद साधला. यावेळी कपिल देव यांचे सहकारी क्रिकेटपटू बलविंदर सिंग संधू, फिक्की महिला विंगच्या अध्यक्षा नीलम शेवलेकर, वरिष्ठ  उपअध्यक्षा रेखा मगर, उपाध्यक्ष पिंकी राजपाल ,खजिनदार सोनिया राव, सहखजिनदार पुनम खोच्चर, सचिव अनिता अग्रवाल, सहसचिव सुजाता सबनीस, उषा पूनावाला यांच्यासह संघटनेच्या  पदाधिकारी उद्योजिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी कपिल देव यांनी १९८३ मध्ये कर्णधार असताना विश्वचषक जिंकलेल्या  आठवणींना उजाळा दिला. क्रिकेटच्या खेळात सोबत जीवनातील चढ-उतार तसेच विश्वचषक जिंकन्यापर्यंतचे अनेक किस्से त्यांनी सांगितले. खेळांमध्ये प्रामाणिकपणा आवश्यक आहे.सध्या सर्वजण प्रेशर खाली आहोत असे सांगत असतात .परंतु कोणती गोष्ट प्रेशर ऐवजी प्लेझर म्हणून समजल्यास नक्कीच यश मिळते. मी एकत्र कुटुंब पद्धतीतून आल्यामुळे मला चांगले संस्कार मिळाले. सर्वांची काळजी, सगळ्यांना सोबत घेऊन जाणे यामुळे मी संघाचे चांगले नेतृत्व करू शकलो. कोणत्याही परिस्थितीत माणूस यशस्वी होऊ शकतो. मी अत्यंत गरीब कुटुंबातून आलेलो आहे. आता मोठ्या प्रमाणावर साधने उपलब्ध आहेत परंतु आमच्या काळात पैसे मिळत नसत त्यामुळे फसवणूक करणे दूरच होते. सगळ्या व्यक्ती सारख्या असू शकत नाहीत. एखादी व्यक्ती चुकीचे असू शकते त्यामुळे सर्वांना वाईट समजू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर प्रेम करा. नक्कीच तुम्ही जिंकू शकता. खेळात जिंकणे किंवा कोणतीही गोष्ट मिळवणे यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न यातून यश नक्की मिळते. अशा शब्दात त्यांनी पुण्यातील महिला उद्योजिकांचा विश्वास आणखीन दृढ केला.

कपिलदेव यांचे सहकारी बलविंदरसिंग संधू यांनी कपिल देव यांच्या कर्णधार पदाच्या व एकंदरीतच जीवनपटा ची माहिती यावेळी सांगितली. कपिल हा एक खऱ्या अर्थाने मोठा व्यक्ती आहे. सर्वांशी मित्राप्रमाणे वागणे व सर्वांची काळजी घेणे हे त्याचे दोन चांगले गुण आहेत.प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवणे ही त्यांची वेगळी शैली आहे. क्रिकेट मधील मोठा खेळाडू याच्यासह माणूस म्हणून देखील कपिल हा खरोखर एक मोठी व्यक्ती आहे या शब्दात 1983 च्या भारतीय संघातील क्रिकेटपटू बळविंदर संधु  या सहकार्याने यांनी कपिल देव यांचा मोजक्या शब्दात गौरव केला.

यावेळी कपिल देव यांचा पुणेरी पगडी देऊन संघटनेच्यावतीने सन्मान करण्यात आला. फिक्की महिला विंग मधील महिला उद्योजिकांना व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी संघटनेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष नीलम सेवलेकर यांनी दिली. महिला उद्योजिकांना दिशा देण्यासाठी आगामी काळात विविध उद्योग मार्गदर्शन शिबिर परिषदा तसेच कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. कपिलदेव यांनी यावेळी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात उपस्थित महिला उद्योजिकांसोबत संवाद साधला.