थरारक सामन्यात भारताची बांगलादेशवर मात, सेमीफायनलचं तिकीट केलं पक्क!

सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी२० विश्वचषक २०२२च्या (T20 World Cup 2022) गट २ मधील संघातील उपांत्य फेरीची चुरस रोमांचक बनत चालली आहे. दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. तर दुसऱ्या स्थानासाठी भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश संघात चुरस सुरू आहे. अशातच भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात बुधवारी (०२ नोव्हेंबर) ऍडलेड येथे रंगतदार सामना झाला. पावसाच्या व्यत्ययानंतर बांगलादेशला १६ षटकात १५१ धावांचे आव्हान मिळाले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला १४५ धावाच करता आल्या आणि भारताने ५ धावांनी सामना खिशात घातला. या विजयासह भारताचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात १८४ धावा केल्या होत्या. या डावात भारताकडून पुन्हा एकदा विराट कोहली याने नावाला साजेशी खेळी केली होती. त्याने ४४ चेंडूत १ षटकार आणि ८ चौकार मारत नाबाद ६४ धावा जोडल्या होत्या. तर मागील तिन्ही सामन्यात सरासरी प्रदर्शन करणाऱ्या केएल राहुलने अर्धशतक झळकावले.

प्रत्युत्तरात बांगलादेशचा सलामीवीर लिटन दासने भारतीय गोलंदाजांची चांगलीच परिक्षा घेतली. २७ चेंडूत २२२.२२ च्या स्ट्राईक रेटने धावा काढत त्याने संघाला विजयाच्या नजीक नेले. मात्र ६० धावांवर त्याची विकेट पडली. त्यानंतर सामना भारताच्या बाजूने वळला. अर्शदीप सिंग (०२ विकेट्स), हार्दिक पंड्या (०२ विकेट्स) मोहम्मद शमी (०१ विकेट) यांनी आपल्या जादुई गोलंदाजीने बांगलादेशला १४५ धावांवर रोखले.