Indian climate | देशभरात तीव्र उष्णतेची लाट अजूनही कायम; ‘या’ शहरात काल होते सर्वोच्च तापमान

देशभरात (Indian climate) काही राज्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट अजूनही कायम आहे. दिल्लीतल्या नजफगडमध्ये काल देशातलं सर्वोच्च ४७ पूर्णांक ८ दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर मुंगेशपूर आणि पितमपुरा मध्येही तापमान ४७ अंशाच्या पुढेच राहिले.

दिल्लीतल्या बहुतांश भागात काल कमाल ४५ ते ४७ अंश तापमानाची नोंद (Indian climate) झाली जे सर्वसामान्य तापमानापेक्षा चार ते सहा अंशांनी अधिक आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, वाळवंटी भाग असलेल्या राजस्थानच्या तुलनेतही दिल्लीतल्या काही भागात उष्णतेचे प्रमाण जास्त होतं. तर उत्तर प्रदेश, आग्रा मध्येही ४७ पूर्णांक ७ दशांश तापमानाची नोंद झाली.

दरम्यान, हवामान खात्यानं दिल्ली, हरियाना, पंजाब आणि पश्चिम राजस्थानला उष्णतेच्या लाटेचा लाल बावटा तर पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारला केशरी बावटा दिला आहे. येत्या बुधवारपर्यंत राजस्थान, पंजाब, हरयाणा, चंडीगढ आणि दिल्लीच्या बहुतेक भागात उष्णतेच्या गंभीर लाटेची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे. एकीकडे देशात उष्णतेची लाट कायम असतानाच, भारतीय हवामान खात्यानं नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजे मान्सून या महिनाअखेर केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज वर्तवला आहे. मान्सूननं निकोबार बेटांवर काल हजेरी लावली आहे. कृषी आधारित अर्थव्यवस्थेची जीवनरेखा असलेल्या मान्सूननं मालदिवचा काही भाग, दक्षिण बंगालची खाडी, निकोबार बेटं आणि दक्षिण अंदमानात आगमनाची वार्ता दिली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप