पहिल्या नजरेतच पत्नी देविशावर फिदा झाला होता सूर्यकुमार, अशी राहिलीय त्यांची लव्हस्टोरी

‘तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दिवाना सनम’, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या ब्लॉकब्लास्टर हिंदी सिनेमात शाहरुख खान काजोलसाठी हे गाणे गाताना दिसतो. खऱ्या आयुष्यात याच गाण्याच्या ओळी सूर्यकुमार यादव आणि पत्नी देविशा शेट्टी यांना लागू होतात!

तोडफोड मंडळाचा अध्यक्ष सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या भरघोस यशाची सर्वात मोठी प्रेरणास्त्रोत त्याची पत्नी देविशा शेट्टी (Devisha Shetty) राहिलीय. वयाची तिशी ओलांडली तरीही सूर्यकुमार भारतीय संघात एक संधी मिळण्यासाठी झगडत होता. या कठीण काळात सूर्यकुमारला त्याच्या पत्नी देविशानेच धीर दिला आणि त्याची हिंमत बनून त्याच्या पाठीशी उभी राहिली. याच सूर्यकुमार आणि देविशाच्या प्रेमाचे धागे कसे जुळले? आणि प्यार वाली लव्हस्टोरी लग्नाच्या मंडपापर्यंत कशी पोहोचली?, याबद्दल जाणून घेऊ… (Suryakumar Yadav Lovestory)

कॉलेजमध्ये झाली पहिली मुलाखत
सूर्यकुमार आणि देविशाची प्रेमकहाणी कॉलेजमध्ये सुरू झाली होती. सूर्यकुमार मुंबईच्या पोद्दार कॉलेज ऑफ आर्ट्समध्ये पदवीधरचे शिक्षण घेत होता. देविशादेखील याच कॉलेजमध्ये शिकत होती. एकदा कॉलेजमधील एका कार्यक्रमात देविशाने डान्स परफॉर्मन्स केला होता. तेव्हाच सूर्यकुमारने पहिल्यांदा देविशाला पाहिले होते आणि तो तिच्या प्रेमात पडला होता.

कॉलेजमधील या कार्यक्रमानंतर त्यांची चांगली मैत्री झाली. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि जवळपास ५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २०१६ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला.

कोण आहे देविशा शेट्टी?
सूर्यकुमारची पत्नी देविशा ही पेशाने डान्स टीचर आहे. परंतु ती तिचा अधिकतर वेळ कुटुंबासोबत घालवते. ती सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते. तसेच बऱ्याचदा सूर्यकुमारला स्टेडियममधून चीयर करताना दिसते.