भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवचा ‘आधारस्तंभ’ हरपला, वडिलांचे ७४व्या वर्षी निधन

भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) याच्याशी संबंधित एक दु:खद बातमी समोर येत आहे. उमेश यादव याचे वडील (Umesh Yadav’s Father) टिळक यादव (Tilak Yadav) यांचे वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले आहे. टिळक यादव गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते, त्यामुळे त्यांच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना घरी आणले असता बुधवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू (Umesh Yadav’s Father Passed Away) झाला.

उमेशचे वडील प्रसिद्ध कुस्तीपटू होते
टिळक यादव हे तरुणपणी प्रसिद्ध कुस्तीपटू होते. ते उत्तर प्रदेशातील पडरौना जिल्ह्यातील पोकरभिंडा गावचे रहिवासी होते. वेस्टर्न कोल फिल्डमध्ये नोकरीच्या निमित्ताने ते नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील वलनी खाणीत कुटुंबासह राहत होते. टिळक यादव यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. टिळक यादव यांना तीन मुले कमलेश, क्रिकेटर उमेश, रमेश आणि एक मुलगी आहे. नागपूर जिल्ह्यातील कोलार नदी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उमेशला भारतीय संघात फारशी संधी मिळत नाहीय
उमेश यादव 35 वर्षांपासून कसोटी संघाचा नियमित भाग आहे, परंतु त्याला अलीकडच्या काळात फारशी संधी मिळालेली नाही. उमेशने भारतासाठी आतापर्यंत 54 कसोटी, 75 एकदिवसीय आणि 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये उमेशने 30.20 च्या सरासरीने 165 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 88 धावांत सहा विकेट्स. याशिवाय उमेशने एकदिवसीय सामन्यात 106 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत. उमेशने भारताकडून शेवटचा सामना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता.