भले शाब्बास! भारताच्या २७ वर्षीय तरुणाने सोडवलं २५०० वर्षांपूर्वीचं संस्कृत भाषेतील ‘ते’ कोडं

भारतात प्रतिभेची कमी नाही, हे आजवर अनेक दिग्गजांनी अशक्यप्राय गोष्टी साध्य करत दाखवून दिले आहे. असेच एक उल्लेखनीय काम भारताच्या २७ वर्षीय तरुणाने केले आहे. संस्कृत व्याकरणाशी संबंधित जगातील सर्वात मोठे कोडे अखेर अडीच हजार वर्षांनंतर सुटले आहे. भारताच्या ऋषी राजपोपट याने ही कमाल केली आहे.

ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठातून पीएचडी करणाऱ्या भारतीय विद्यार्थी ऋषी राजपोपट याने हे कोडे सोडवले आहे. इसवीसनपूर्व पाचव्या आणि सहाव्या शतकामध्ये लिहिलेल्या या संस्कृत भाषेतील भाषाग्रंथातील या कोडेने विद्वानांनाही गोंधळात टाकले होते.

आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, २७ वर्षीय ऋषी अतुल राजपोपटने (Rishi Rajpopat) संस्कृत भाषेच्या व्याकरणाचे जनक पाणिनी यांनी लिहिलेला मजकूर डीकोड केला आहे, जो सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी लिहिला गेला होता. ऋषी राजपोपटने केंब्रिज विद्यापीठातील सेंट जॉन्स कॉलेजमधील आशियाई आणि मध्य पूर्व अभ्यास विभागातून संस्कृत अभ्यासात पीएचडी पूर्ण केली आहे.

नेमके कोडे काय होते?
चार हजार सुत्रांचा समावेश असलेल्या ‘अष्टध्यायी’ हा ग्रंथ संस्कृत भाषेमागील विज्ञान समजावून सांगतो असं सांगितलं जातं. या ग्रंथामधील रचना आणि नियम पाहून हा फारच क्लिष्ट ग्रंथ असल्याचं सांगितल जातं. शब्द निर्माण करण्यासाठी यामध्ये नमूद करण्यात आलेले नियम हे समजून घेण्यास फारच कठीण असल्याचं म्हटलं जातं. या ग्रंथामधील माहितीच्या आधारे एखादा शब्द कसा तयार करावा किंवा संस्कृतमधील वाक्य कसं तयार करावं याचं मार्गदर्शन केलं जातं. मात्र यामध्येही बरेचदा पाणिनीचे दोनहून अधिक नियम एकाचवेळी वापरले जायचे आणि त्यामधून संभ्रम निर्माण व्हायचा.

हा गोंधळ टाळण्यासाठी पाणिनीने मेटा रुल म्हणजेच (नियमांचा नियम) लिहून ठेवला. पारंपारिक पद्धतीमध्ये हा नियम पुढील प्रमाणे होता : “दोन समान दर्जाचे नियम वापरताना संभ्रम निर्माण झाला तर जो नियम ‘अष्टाध्यायी’मध्ये नंतर लिहिण्यात आला आहे त्याला प्राधान्य क्रमाने वापरावं.”

मात्र आपल्या पीएचडीच्या ‘इन पाणिनी वी ट्रस्ट’ नावाच्या थिसिसीमध्ये डॉ. राजपोपाट यांनी हा मेटा रुल स्वीकारता येणार नाही, असं म्हटलं आहे. पाणिनीच्या सुत्रांचा साधा आणि समजेल असा अर्थ काढावा जो शब्दांशी अधिक प्रमाणिक असेल असं डॉ. राजपोपाट यांचं म्हणणं आहे.

मेटा रुल कायमच चुकीच्या अर्थाने समजून घेण्यात आला असंही डॉ. राजपोपाट यांनी म्हटलं आहे. पाणिनीला नियम शब्दाच्या डावीकडे वापरावा की उजवीकडे वापरावा याबद्दल सांगयचं होतं. उजवीकडील शब्दानुसार नियम वापरावा असा या मेटा रुलचा अर्थ असल्याचं डॉ. राजपोपाट यांचं म्हणणं आहे. हा नियम वापरला तर ‘अष्टाध्यायी’ हे अगदी अचूक भाषा निर्माण करणारं मशिन असल्याचं डॉ. राजपोपाट यांच्या लक्षात आलं. नियम अशापद्धतीने वापरल्यास प्रत्येकवेळी यामधून अचूक संस्कृत शब्द आणि वाक्य निर्माण करतात येतात असं डॉ. राजपोपाट यांचं म्हणणं आहे.

डॉ. राजपोपाट यांनी लावलेला शोध हा क्रांतीकारी असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या नियमांचा वापर केल्याने कंप्युटर्समध्ये पहिल्यांदाच पाणिनीचं व्याकरण फीड करता येणार आहे असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.