शॉकिंग! ‘भारत जोडो यात्रे’त राहुल गांधी यांना बॉम्बने उडवण्याची धमकी

इंदूर: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरू केलेली पदयात्रा वेगाने काश्मीरच्या दिशेने जात आहे. २० नोव्हेंबरला ही भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) मध्य प्रदेशात प्रवेश करेल. तत्पूर्वी शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) राहुल गांधी यांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने जिल्हा आणि पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील जुनी इंदूर पोलिस ठाणे क्षेत्रातील एका मिठाईच्या दुकानात हे धमकीचे पत्र सापडले आहे. सध्या पोलिस शेजारी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पत्र सोडणाऱ्या व्यक्तीचा तपास करत आहेत.

इंदूर तहसीलच्या जुनी इंदोर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या मिठाईच्या दुकानात अज्ञात व्यक्तीने एक पत्र टाकले होते, जे मिठाई दुकान चालकाने पोलिसांच्या ताब्यात दिले. भारत जोडो यात्रेचा भाग म्हणून राहुल गांधी इंदूरच्या खालसा कॉलेजमध्ये थांबले तर त्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी या पत्रात देण्यात आली आहे.

डीसीपी इंटेलिजन्स रजत सकलेचा यांनी धमकीचे पत्र मिळाल्याची पुष्टी केली आहे. हे पत्र उज्जैनहून आल्याचे सांगण्यात येत आहे.