इंदोरीकर महाराजांच्या गाडीला अपघात; तृप्ती देसाई म्हणाल्या, त्यांच्याबरोबर …

पुणे – किर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर (Nivrutti maharaj deshmukh Indorikar) यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. जालना जिल्ह्यातील परतूर येथे रात्री 10 च्या सुमारास इंदोरीकर महाराज (Indorikar maharaj) यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या ड्रायव्हरला किरकोळ इजा झाली असल्याची माहिती आहे.

काल ते जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून किर्तनासाठी जात असताना परतूर येथे एका वळणावर त्यांच्या स्कार्पिओ गाडीची लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक बसली. यात चालक किरकोळ जखमी झाला. या अपघातात इंदोरीकर महाराजांना कुठलीही इजा झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्या म्हणाल्या, इंदुरीकर यांना उदंड आयुष्य लाभो. त्यांच्या गाडीचा अपघात झालेली आत्ता बातमी वाचली… त्यांच्याबरोबर मतभेद आहेतच ,कमी होतील की माहित नाही परंतु आपला दुश्मन जरी असला तरी त्याच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नये असं मनापासून मला वाटतं ,तसे संस्कारच आहेत माझ्यावर. त्यांच्या ड्रायव्हरची तब्येतही लवकर बरी व्हावी हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना असं त्या म्हटल्या आहेत.