‘कोरोनाची तिसरी लाट ही फक्त…’ , इंदुरीकर महाराजांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान

लातूर : सध्या संपूर्ण जग पुन्हा एकदा करोनाच्या संकटाचा सामना करत असून नव्या आव्हानांचा सामना करत आहे. देशात करोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असून याआधी आलेल्या दोन लाटांमध्ये फार मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. दुसऱ्या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र कोरोना या महाभीषण रोगाला काही लोकांनी चेष्टेचा विषय बनवला आहे. त्या सर्वात वरच्या क्रमांकावर कोणी असेल तर सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज.

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी याआधी आपण कोरोनाची लस घेणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. मात्र अशातच महाराजांनी पुन्हा एकदा कोरोना संदर्भात आणखी एक वक्तव्य केलं आहे. ‘मला कोरोना झाला नाही कारण मी माळकरी आहे. कोरोनाची तिसरी लाट आपल्यासाठी नाहीच मात्र ज्यांनी माळा काढल्या त्यांना कोरोना गाठणारच असं विधान इंदोरीकर महाराज यांनी केले आहे. त्यांनी लातूर मध्ये एका कीर्तनात हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

‘दीड वर्ष काय लक्षात कुठे राहिलंय? ८० टक्के भजनं, हरिपाठ विसरले. ४० टक्के किर्तनकारच हरिपाठ विसरले. उत्पन्नच नाही तर हरिपाठ करुन काय करायचं? ४० टक्के माळकऱ्यांनी माळा काढल्या. अंडे खाल्यावर करोना होत नाही कोणीतरी सांगितलं आणि वांगी सोडून अंडी खायला लागले. टीव्हीला माळकऱ्यांना पाच हजार मिळणार असल्याची बातमी आली आणि पुन्हा माळ घातली. पण तिसरी लाट ही फक्त माळा काढणाऱ्यांसाठीच असणार, असं इंदुरीकर महाराज म्हणाले. यावेळी त्यांनी मन खंबीर ठेवणं हेच करोनावरील औषध असल्याचं म्हटलं.