अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी उद्योग क्षेत्राने योगदान द्यावे- भगत सिंह कोश्यारी

पुणे : देशात उद्योगासाठी पोषक वातावरणाची निर्मिती होत असून देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानावरून वरच्या क्रमांकावर आणण्यासाठी यापुढेही उद्योग क्षेत्राने योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

विमान नगर येथे हॉटेल हयात येथे आयोजित डेक्कन चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर संस्थेच्या वार्षिक पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रथीन सिन्हा, उपाध्यक्ष हरी श्रीवास्तव, खजिनदार सुनील गुप्ता, सचिव वासुदेव मालु आदी उपस्थित होते.

कोश्यारी म्हणाले, आज देशाचा सर्वांगीण विकास होत असून देश वेगाने प्रगती करत आहे. उद्योग क्षेत्र बळकटीकरणासाठी शासनाच्यावतीने आवश्यक त्या सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याअनुषंगाने आपल्या सूचना शासनाकडे पाठवाव्यात, असेही ते म्हणाले.

डेक्कन चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर संस्थेने कोरोनाकाळात चांगले काम केले अशा शब्दात गौरव करून राज्यपालांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ते म्हणाले, गरजू लोकांची पर्यायाने समाजाची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. चांगल्या भावनेने समाजाची सेवा करुन समाजाला पुढे आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. आपण करीत असलेल्या चांगल्या कार्यामुळे देशाचा सन्मान वाढेल त्यामुळे आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करुन देशाला सर्वोच्च स्थानावर आणण्यासाठी प्रयत्न करावे.

संस्थेचे अध्यक्ष  सिन्हा आणि उपाध्यक्ष श्रीवास्तव संयुक्तपणे संस्थेविषयी माहिती दिली. संस्थेच्यावतीने कोविड काळात स्थलांतरित गरजू कामगारांना अन्न, वस्त्र, मास्क, सॅनिटायझर आदी पुरविण्यात आले. केईएम रुग्णालय येथे ऑक्सिजन प्लॅन्ट आणि सह्याद्री रुग्णालयाला सुसज्ज कार्डियाक रुग्णवाहिका दिल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचा जीवन गौरव पुरस्कार डॉ. प्रकाश धोका यांना तर उद्योजक श्रीकांत बडवे आणि सुप्रिया बडवे (उत्कृष्ट उद्योजक), स्व.सुरेंदर अगरवाल (समाजकार्य) (यांच्यावतीने पत्नी प्रमिला अगरवाल), उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे (उत्कृष्ट सेवा), किऑन इंडिया प्रा.लि., आयटीसी लि. संस्थेला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.