भारत वि. पाकिस्तान सामन्याची उत्सुकता शिगेला, पण मेलबर्नचं हवामान काय म्हणतंय?

INDvsPAK : आज (२३ ऑक्टोबर) टी२० विश्वचषकात (T20 World Cup) भारत आणि पाकिस्तान हे क्रिकेटविश्वातील सर्वात कट्टर प्रतिद्वंद्वी आमने सामने येणार आहेत. उभय संघात मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकत भारतीय संघ आशिया चषकातील मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रयत्नशील असेल. तर पाकिस्तानचा संघही विजयासह टी२० विश्वचषक मोहिमेची सुरुवात करण्यासाठी दम दाखवेल.

भारत विरुद्ध पाकिस्तान संघात आतापर्यंत ११ टी२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी ८ सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. तर पाकिस्तानला फक्त ३ सामने जिंकता आले आहेत. टी२० विश्वचषकाबद्दल बोलायचे झाल्यास, भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये ६ सामने झाले आहेत. ज्यापैकी ५ सामने भारताने तर केवळ १ सामना पाकिस्तानने जिंकला आहे.

परंतु या बहुप्रतिक्षित सामन्यात पाऊस अडथळा ठरण्याची (Melbourne Weather) शक्यता आहे. मेलबर्नमध्ये होणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावट पसरले असून हा सामना पूर्ण होईल की नाही, याची भीती क्रिकेट चाहत्यांना सतावत आहे. आज मेलबर्नमध्ये हवामान कसे राहिल?, पावसाची किती शक्यता आहे?, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

तर या आठवड्याच्या सुरुवातीला मेलबर्नमध्ये मोठा पाऊस पडला होता. त्यानंतर बुधवारी आणि गुरुवारीही पावसाची रिपरिप सुरू होती. Accuweather नुसार, रविवारी दिवसभर मैदान ढगाळ राहील, तर पावसाची शक्यता ४० टक्के आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांच्या तुलनेत पावसाची शक्यता फारच कमी आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना भारत-पाकिस्तान सामना पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. सामना सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. मेलबर्नमध्ये गेल्या काही तासांपासून पाऊस पडला नाही, परंतु ढगाळ वातावरण आहे. आता या सामन्यादरम्यान पाऊस खलनायक ठरू नये एवढीच अपेक्षा चाहत्यांना आहे.