‘जग कुठला विचार करतंय आणि आपण कुठल्या विषयांमध्ये जनतेला गुंतवून ठेवतोय याचं आत्मपरीक्षण झालं पाहिजे’

मुंबई – अलीकडच्या काळात विकासाचे मुद्दे सोडून बाकीच्या मुद्द्यांवर बरीच चर्चा केली जात असल्याची खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रदेश कार्यालयात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केली. मशिदीवर लाऊडस्पीकर(loudspeaker) लावण्याचा मुद्दा भाजपने उठवला असून यावर माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपले मत व्यक्त केले.

कुणी कुठला मुद्दा घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. सरकार कुठलंही असो सुप्रीम कोर्ट, (supreme court )हायकोर्ट जे सांगेल त्याची अंमलबजावणी सरकारला करावी लागते आणि मुद्दा पटला नाही तर अपीलही करावे लागते. कोर्टाने काय निर्णय दिला आहे तो वाचला नाही मात्र त्याची माहिती घेऊन कोर्टाचा अवमान होणार नाही असा निर्णय घेतला जाईल असेही अजित पवार म्हणाले.

जातीय सलोखा राहण्याच्यादृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी प्रयत्न केला पाहिजे. पक्षाच्या नेत्यांनीही तीच भूमिका मांडण्याचं काम केलं पाहिजे. यंदाच्या १५ अॉगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. आज ७५ वर्ष पूर्ण होत असताना जग कुठला विचार करतंय आणि आपण कुठल्या विषयांमध्ये जनतेला गुंतवून ठेवतोय आणि कुठल्या विषयाला महत्त्व देतोय याचं आत्मपरीक्षण… आत्मचिंतन झालं पाहिजे असे सांगतानाच जनतेनेही या विषयाचा फार गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे असे वैयक्तिक मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.