केंद्रीय यंत्रणांमार्फत कुटुंबीयांच्या मालमत्तेची चौकशी करा; शिवसेनेच्या महिला आमदाराचे थेट राष्ट्रपतींना पत्र

मीरा भाईंदर – मीरा भाईंदरच्या शिवसेनेच्या आमदार गीता जैन (Shiv Sena MLA Geeta Jain of Mira Bhayander) यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind)  यांना पत्र लिहून त्यांची व त्यांच्या कुटुंबियांच्या व्यवसायाची केंद्रीय तपास यंत्रणा (Central Investigation Agency) मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. तपासात काहीच आढळले नाही तर तसे केंद्रीय यंत्रणांनी जाहीर करून आम्हास प्रोत्साहित करावे आणि अश्या प्रकारची भूमिका अन्य लोकप्रतिनिधी बाबत सुध्दा घेण्यात यावी जेणे करून भ्रष्टाचार (corruption )विरुद्धच्या लढ्याला बळ मिळेल अशी अपेक्षा आ. जैन यांनी व्यक्त केली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीत दोषी आढळले तर मी राजकारण सोडेन. तसेच माझ्यासह कुटुंबियांची बदनामी करणाऱ्यांनी माझ्या चांगल्या कामावरती सुध्दा टिप्पणी करावी असा टोला गीता जैन यांनी चर्चा करणाऱ्यांना लगावला.महाराष्ट्रात विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावला जात असून ठिकठिकाणी धाडसत्र आणि अटकसत्र सुरू आहे. त्यामुळे दूषित वातावरण तयार झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

भाईंदर ग्रामपंचायत सरपंच, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि राजस्थानमधील पाली लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेले सासरे मिठालाल जैन (Mithalal Jain) यांनी काँग्रेस सोडल्यानंतर केंद्र सरकारने प्राप्तिकर विभागाचा ससेमिरा मागे लावला होता. आताही आपणाला मीरा-भाईंदर शहरात काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपली आणि कुटुंबीयांची व्यावसायिक प्रतिमा मलीन करण्याचा, बदनाम करण्याचा घाणेरडा खेळ काही लोक वारंवार करीत आहेत. म्हणूनच केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी आमदार गीता जैन यांनी केली आहे.