पत्राचाळ प्रकरणी शरद पवार यांची चौकशी करा, अतुल भातखळकरांची आक्रमक मागणी

मुंबई – पत्राचाळ घोटाळा (Patrachal) प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. ईडीने या प्रकरणी दाखल केलेल्या आरोप पत्रात शरद पवारांच्या (Sharad Pawar) नावाचाही उल्लेख आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. 2007 साली संजय राऊत (Sanjay Raut), तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री यांच्या नावाचा उल्लेख आरोप पत्रात असल्याचं म्हटलं जात आहे.

2006 – 07 या काळात गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणी ज्या बैठका झाल्या, त्यात म्हाडाचे काही अधिकारी तत्कालीन मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हेदेखील उपस्थित होते, असं स्पष्टपणे ईडीने आरोप पत्रात नमूद केलं आहे. ईडीनं (ED) आरोपपत्र दाखल केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

2006-2007 या काळात एका तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि एक माजी मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीनंतर गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून राकेश वाधवान यांना पत्राचाळीचा विकास करण्यासाठी आणण्यात आलं होतं. त्यानंतर यामध्ये 1 हजार 34 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं त्या चार्जशिटमध्ये म्हणण्यात आलं आहे.

दरम्यान, पत्राचाळ प्रकरणी राष्ट्रादवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे. त्यांनी याबाबत एक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी पत्राचाळीच्या भ्रष्टाचाराचा आवाका पाहाता हे प्रकरण फक्त संजय राऊत यांना झेपणारे आहे असे सुरुवातीपासून वाटत नव्हते. बड्या सत्ताधारी राजकारण्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हा भ्रष्टाचार अशक्य होता. ED च्या आरोपपत्रात हे नाव आहे. One and only one शरद पवार. याप्रकरणी तत्काळ चौकशी व्हावी, असे अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.