‘भारत जोडो यात्रे’च्या समारोपाला उपस्थित राहण्याचे 21 राजकीय पक्षांना आमंत्रण

Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा समारोप 30 जानेवारी रोजी श्रीनगर, काश्मीरमध्ये होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 21 राजकीय पक्षांना श्रीनगरमध्ये ‘भारत जोडो’ यात्रेच्या समारोपासाठी आमंत्रित केले आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी या पक्षांच्या प्रमुखांना लिहिलेल्या पत्रात असेही म्हटले आहे की, त्यांच्या उपस्थितीमुळे यात्रेतील सत्य, करुणा आणि अहिंसेचा संदेश बळकट होईल. खरगे म्हणाले की, श्रीनगरमध्ये ३० जानेवारी रोजी होणाऱ्या ‘भारत जोडो यात्रे’च्या समारोप समारंभाला उपस्थित राहण्यासाठी मी तुम्हाला व्यक्तिशः निमंत्रित करतो. हा कार्यक्रम महात्मा गांधींच्या स्मृतीला समर्पित आहे, ज्यांनी द्वेष आणि हिंसेच्या विचारसरणीविरुद्ध त्यांच्या अथक संघर्षात या दिवशी प्राण गमावले.

आपला देश संकटाचा सामना करत असताना, लोकांचे प्रश्न पद्धतशीरपणे वळवले जात असताना ही यात्रा एक शक्तिशाली आवाज म्हणून उदयास आली आहे, असेही ते म्हणाले. मला आशा आहे की तुम्ही उपस्थित राहून या संदेशाला बळ द्याल.

‘भारत जोडो यात्रा’ 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झाली आणि आता पंजाबमध्ये पोहोचली आहे. पंजाबनंतर ही यात्रा हिमाचल प्रदेश आणि त्यानंतर जम्मू-काश्मीरला जाणार आहे. ३० जानेवारीला श्रीनगरमध्ये यात्रेचा समारोप होणार आहे.