बेस प्राइस काय असते? कोणत्याही खेळाडूची बेस प्राइस कोण ठरवतं? जाणून घ्या सर्वकाही

IPL Auction: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या लिलावापूर्वी लोकांच्या मनात अनेक प्रश्न येतात आणि त्यात खेळाडूंची मूळ किंमत (Base Price) देखील एक मोठा प्रश्न आहे. लिलावात प्रत्येक खेळाडूची ठराविक मूळ किंमत असते, त्यावर लिलावात बोली लावली जाते. पण ही मूळ किंमत काय आहे?, ती कोण ठरवतं? कसं ठरवतं? हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. मूळ किंमतीशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊया…

काय असते मूळ किंमत?
मूळ किंमतीपासूनच खेळाडूचा लिलाव सुरू होतो. उदाहरणार्थ, जर खेळाडूची मूळ किंमत 1 कोटी रुपये असेल, तर त्याच्यासाठी बोली फक्त 1 कोटी रुपयांपासून सुरू होईल आणि त्यानंतर ती तिथून पुढे नेली जाईल. जर अनेक संघांनी बोली लावली नाही, तर खेळाडूला त्याच्या मूळ किंमतीत म्हणजे फक्त एक कोटी रुपयांना विकले जाईल. त्यापेक्षा कमी किंमतीत खेळाडू विकत घेता येणार नाही. म्हणून मूळ किंमत ठेवण्यात आली आहे.

कोण ठरवतं खेळाडूंची मूळ किंमत?
खेळाडू स्वतः त्यांची मूळ किंमत ठरवतात आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सांगतात. मूळ किंमत निश्चित करण्याबरोबरच खेळाडू त्यांच्या बोर्डाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेतात आणि ते बीसीसीआयला सादर करतात. खेळाडूंची मूळ किंमत 20 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंत असू शकते. फारच कमी खेळाडू दोन कोटींची मूळ किंमत ठेवतात आणि बहुतेक मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचे या मूळ किंमतीच्या यादीत असतात.

अनकॅप्ड खेळाडू अनेकदा त्यांची मूळ किंमत 20 लाख रुपये इतकी कमी ठेवतात. अनकॅप्ड खेळाडू म्हणजे, ज्यांनी आपल्या देशासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही. काहीवेळा कमी मूळ किंमत असलेले खेळाडूही खूप जास्त किंमतीला विकले जातात.