फक्त २० टी२० खेळलेल्या इंग्लंडच्या ‘या’ पठ्ठ्याची लागली लॉटरी, सनरायझर्स हैदराबादने १३.२५ कोटींना घेतले विकत

IPL Auction Live: इंडियन प्रीमियर लीग २०२३चा मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) आज (२३ डिसेंबर) केरळच्या कोची येथे सुरू आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० वाजता या लिलावाची सुरुवात झाली.

इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक (Harry Brook) याला लिलावात विकत घेण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स संघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. हॅरी ब्रूक्स हा इंग्लंडचा उजव्या हाताचा फलंदाज असून तो १.५० कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता. त्याच्यावर सर्वप्रथम बेंगलोर आणि राजस्थान या संघांनी बोली लावल्या. पुढे त्याची बोली ५ कोटींपर्यंत गेल्यानंतर हैदराबाद संघानेही त्याला विकत घेण्यात रस दाखवला. शेवटी राजस्थान आणि हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रस्सीखेच झाल्यानंतर अखेर काव्या मारनच्या संघाने त्याला अविश्वसनीय अशा १३.२५ कोटींच्या किंमतीत विकत घेतले आहे. ब्रूक्सने इंग्लंडकडून फक्त २० टी२० सामने खेळले असून ३७२ धावा केल्या आहेत.(IPL Auction Live: Harry Brook goes to SRH).

दरम्यान गतवर्षीची विजेती फ्रँचायझी गुजरात टायटन्सपासून (Gujrat Titans) आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सपर्यंत (Mumbai Indians) सर्व १० फ्रँचायझींचे संघमालक ऑक्शन टेबलवर बसून संघ मजबूत बनवताना दिसत आहेत. लिलावात एकूण ४०५ खेळाडू सहभागी झाले असून त्यांपैकी २७३ भारतीय, १३२ परदेशी आणि ४ खेळाडू असोसिएट देशांचे आहेत. आयपीएल फ्रँचायझी या ४०५ पैकी केवळ ८७ खेळाडूंना विकत घेतील. काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीच्या पर्समध्ये सर्वाधिक ४२.२५ कोटी रुपये आहेत. तर शाहरुख खानच्या मालकीचा कोलकाता नाईट रायडर्स संघ सर्वात कमी ७.०५ कोटींसह लिलावात उतरला आहे.