अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेली विधाने म्हणजे हाय कमांडचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न ?

ठाणे – शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केलेल्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. ज्या चव्हाणांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर ‘आदर्श’ घालून दिला त्यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व देत नसल्याचे मत म्हस्के यांनी व्यक्त केले आहे. त्यासोबतच ज्यांच्या स्वतःबद्दल गेल्या काही दिवसात ते नाराज असून इकडे तिकडे जाणार आशा बातम्या येत आहेत, जे स्वतः विधान परिषदेच्या निवडणुकीला गैरहजर राहिले ते आता माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर स्वैर आरोप करत असून त्याला फार महत्व देण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले. ठाण्यातील आनंदआश्रमात माध्यमांशी बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली.

त्यासोबतच चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे (Chandrakant Khaire and Ambadas Danve) यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, खैरे हे ज्येष्ठ नेते असले तरीही गेली काही वर्षे निवडणूक हरल्यानंतर त्यांनी केलेली वक्तव्य ऐकली असती तर ते पक्षासोबत किती एकनिष्ठ आहेत हे सगळ्यांनाच समजलं असत, त्यावेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या पाया पडतानाचा त्यांचा फोटो देखील व्हायरल झाला होता. मात्र आता ते मातोश्रीचे (Matoshree) मन जिंकण्यासाठी वाट्टेल ते बरळत आहेत. दुसरीकडे अंबादास दानवे हे यंदा पहिल्यांदा टेम्भी नाक्यावरील देवीच्या दर्शनाला आले होते. यापूर्वी कधीही ते ठाणे शहरात या देवीच्या दर्शनाला आले नव्हते यावेळी लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी पहिल्यांदाच त्यांनी या नवरात्रोत्सवाला हजेरी लावली. देवीच्या दर्शनासाठी आल्याने त्यांचा उचित मान ठेवण्यात आला. दिघे साहेबांच्या पश्चात या देवीचा नवरात्रोत्सवाच आयोजन आणि त्यानी सूरु केलेले उपक्रम आदरणीय एकनाथ शिंदे हेच पुढे घेऊन जात आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना त्यांनी भान बाळगावे असा सल्ला म्हस्के यांनी दिला.

त्यासोबतच नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला निवडणूक चिन्हबाबाबत निर्णय घ्यायचा अधिकार असल्याचे स्पष्ट केल्याने या लढ्यात देवी कोणासोबत आहे ते स्पष्ट झाले असल्याचे म्हस्के यांनी म्हटले. कोणतेही विचार नसलेली लोकं वाट्टेल ते बोलण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांना फार महत्व देण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.