‘काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हर्बल तंबाखू खाऊन आरोप करतात का?’

मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील प्रचारात केलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोरोना आणल्याचा आरोप हास्यास्पद असून पटोले यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. हर्बल तंबाखू खाऊन त्यांनी हा आरोप केला का, याचे उत्तर द्यावे, असा जळजळीत सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला.

केशव उपाध्ये म्हणाले की, देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव दिसू लागल्यामुळे त्या पक्षाचे नेते विचलित झाले आहेत. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपाच्या दणदणीत विजयानंतर आता पुन्हा देगलूरमध्येही भाजपा विजयी होणार हे ध्यानात आल्यामुळे काँग्रेसचे नेते अस्वस्थ होणे समजू शकते. पण त्यामुळे त्यांनी हर्बल तंबाखू खाल्याप्रमाणे हास्यास्पद आरोप करू नयेत.राहुल गांधी यांना नेते मानणाऱ्या प्रदेशाध्यक्षांनी एवढी पप्पूगिरी केली तर त्याचे आश्चर्य वाटत नाही, असाही टोला त्यांनी हाणला.

शिवसेनेने विश्वासघात केल्यामुळे काँग्रेस पक्षाला राज्यात सत्तेची लॉटरी लागली. त्या धक्क्यातून अजूनही काँग्रेसचे नेते सावरलेले दिसत नाहीत. त्यामुळे ते प्रचारसभांमध्ये हास्यास्पद आरोप करतात आणि बिनधास्त खोटे बोलतात हे नाना पटोले यांच्या वक्तव्यावरून दिसते. देशात कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारी २०२० रोजी केरळमध्ये आढळला पण नानांनी बिनधास्त मार्चच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची सुरुवात झाली असे ठोकून दिले. नानांच्या भाषणातील अशा थापेबाजीमुळे मतदारांची करमणूक झाली तरी त्यामुळे त्यांच्या पक्षाला मते मिळतील, अशा भ्रमात त्यांनी राहू नये, असे ते म्हणाले.