संजय राऊत हे काय ब्रह्मदेव आहेत का? दगाबाजीचा आरोप होताच भुयार संतापले 

मुंबई :  राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha elections) महाविकास आघाडीचे (MVA) तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची अनेक मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. विरोधीपक्ष नेते  देवेंद्र फडणवीस  (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर  बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी थेट प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीला मतं न देणाऱ्यांची नावं जाहीर केली आहेत.  ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. बहुजन विकास आघाडीचे (BVA) तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मतं दिली नाहीत, असं संजय राऊत यांनी सांगितलं.  घोडेबाजारातील घोड्यांमुळं सरकारवर फरक पडणार नाही. फार हरभऱ्याच्या झाडावर चढू नका, हरभरे अपक्षांनी खाल्ले आहेत, असा टोलाही राऊतांनी विरोधकांना लगावला.

दरम्यान, दगाबाजीचा आरोप झाल्यानंतर आता आमदार  देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी राऊत यांना खडेबोल सुनावले आहेत.  संजय राऊत हे काय ब्रह्मदेव (Brahma) आहेत का ? हे ब्रह्मदेवापेक्षा मोठे आहेत असं वाटायला लागलंय. मतदान गोपनीय राहतं, मी दिलं नाही हे यांना कसं माहित. मी महाविकास आघाडीत सुरुवातीपासून आहे हे नंतर आले. किमान समान कार्यक्रम ठरला त्यावेळी मी सोबत होतो, शिवसेना नंतर आली, असं ते म्हणाले.

आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटलं की, मी कुठलाही दगाफटका केलेला नाही. माझी मुख्यमंत्र्यांवर नाराजी आहे पण माझी वयक्तिक नाराजी नाही. माझ्या मतदारसंघातील काही प्रश्न आहेत. आमच्या प्रश्नांसाठी वेळ दिला नाही, त्यावरुन माझी नाराजी नाही.  माझी नाराजी मुख्यमंत्र्यांवर होती जी मी उघडपणे व्यक्त केली, नाराजी उद्धव ठाकरेंपुढे (Uddhav Thackeray)  नाही तर काय दाऊद समोर मांडायची का ? असा सवाल देखील त्यांनी केला.