सरकार पाडण्यासाठी जो काही खर्च केला असेल तो खर्च गॅस दरवाढीतून वसूल केला जात आहे का?

मुंबई – एकीकडे महाविकास आघाडीतील (MVA) ५० आमदार फोडले आणि दुसरीकडे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करताच भाजप (BJP) सरकारने घरगुती गॅस सिलेंडरमध्ये ५० रुपयांची दरवाढ (An increase of Rs 50 in domestic gas cylinders) केली आहे यावरुन जनतेने काय तो निष्कर्ष काढावा? असा चेंडू राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी जनतेच्या कोर्टात भिरकावला आहे.

महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या ५० आमदारांचे बंड आणि एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस (Eknath Shinde and Devendra Fadnavis) यांचे सरकार आल्यावर लगेचच केंद्रसरकारने घरगुती गॅस सिलेंडरमध्ये ५० रुपयांची दरवाढ केली आहे. दोन्हीकडे ५० बंडखोर आमदार आणि ५० रुपयांची गॅस सिलेंडर दरवाढ हे आकडे काहीतरी संकेत देत आहेत असेही महेश तपासे म्हणाले.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी एक मोठ्या अदृश्य शक्तीने बंडखोर आमदारांवर जो काही खर्च केला असेल तो खर्च गॅस दरवाढीतून वसूल केला जात आहे का? अशी शंका आता जनतेतून व्यक्त व्हायला लागली आहे असेही महेश तपासे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचं सरकार आलंय आम्ही पेट्रोल – डिझेलवरील (Petrol – Diesel) कर कमी करु असा दिलासा देण्याचे वक्तव्य केलेले असतानाच दुसरीकडे भाजपने घरगुती गॅस सिलेंडरमध्ये दरवाढ केल्याने जनतेतून आश्चर्य व्यक्त होत असल्याचे महेश तपासे म्हणाले.