पेट्रोल, डिझेल, सिलिंडर यासंदर्भात भाजपचा एकतरी नेता, मंत्री बोलतोय का?

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून महागाईच्या झळा तीव्र झाल्या असून, पेट्रोल-डिझेलसह (Petrol-diesel) अनेक वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचे दरही वाढत असून, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात देखील वाढ झाली आहे.

आधीच लॉकडाउननंतर सामान्य माणसाचे जगणे असह्य झाले असताना, आता केंद्रातील सरकारने महागाईचा आणखी एक धक्का दिल्याने सामान्य माणूस गॅसवर गेला आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात तब्बल ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पन्नास रुपयांच्या वाढीसह 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरचे (cylinder) दर आता ९९९.५० रुपयांवर पोहोचले आहेत. इथून पुढे एका सिलिंडरसाठी एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत. सिलिंडर महागल्याने गृहिणीचे आर्थिक बजेट कोलमडणार (The housewife’s financial budget will collapse) आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाजपला पुन्हा लक्ष्य केले आहे. महागाईवरुन केंद्रावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, देशात महागाई इतकी वाढलीय की त्यावर कुणी केंद्रातला नेता बोलत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Prime Minister Narendra Modi) युक्रेन आणि रशियातील युद्धाची चिंता आहे. त्यांचे भक्त त्यांची वाहवा करत आहेत. पण इथं देशातील जनता महागाईशी युद्ध करत आहे. पेट्रोल, डिझेल, सिलिंडर यासंदर्भात भाजपचा एकतरी नेता, मंत्री बोलतोय का? भोंग्यांवर कसले बोलता. महागाईवर बोला. भोंग्यांवर बोलणं तुमचं कर्तव्य नाही, महागाईवर (Inflation) बोलणं तुमचं कर्तव्य आहे, असं म्हणत राऊतांनी हल्लाबोल केला आहे.