मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इसमाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

हैद्राबाद – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांना ट्विटरवर जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या व्यक्तीला अटक केली. सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला सीआयडी सायबर क्राइम शाखेने पकडले आहे. त्याचीही पोलीस चौकशी करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला व्यक्ती राजापालम फणी हा मूळचा आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रवरमचा रहिवासी असून हैदराबाद येथे विक्री प्रतिनिधी म्हणून काम करतो. एसपी, सीआयडी सायबर क्राईम, जीआर राधिका यांनी सांगितले की त्यांनी तक्रारीच्या आधारे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही तक्रार १६ जानेवारीला आरोपीने केलेल्या ट्विटच्या संदर्भात केली होती. कन्नभाईने बनावट ट्विटर हँडलद्वारे मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ करणारे ट्विटची मालिका केली. एका ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. राज्य जगन सेवा दलाचे उपाध्यक्ष मायलम श्रीकांत यांच्या तक्रारीवरून तिरुपती पोलिसांनी १७ जानेवारी रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.

नंतर आरोपीने ट्विट डिलीट केले आणि ट्विटर अकाऊंट निष्क्रिय केले. त्याने आपला मोबाईलही बंद केला. मात्र, पोलिसांनी आयपी अॅड्रेसच्या मदतीने त्याची ओळख पटवून त्याला ताब्यात घेतले. आरोपीने आपल्या जबानीत पोलिसांना सांगितले की, तो जनसेना पक्षाचा समर्थक असून पक्षाचे नेते व अभिनेता पवन कल्याण यांचा प्रशंसक आहे.