आव्हाडांचे ‘ते’ वक्तव्य महाराष्ट्रद्रोह नाही का? आदित्य ठाकरेंना भाजपचा थेट सवाल

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. च्या ११ सदनिका ईडीनं जप्त केल्या आहेत. ठाण्यातल्या वर्तकनगर या उच्चभ्रू भागात असलेल्या निलांबरी अपार्टमेंट्समध्ये या ११ सदनिका आहेत. हा साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. चा प्रकल्प असून त्यावरून वाद सुरू झाला आहे.

काळा पैसा बनावट कंपन्यांच्या माध्यमातून या प्रकल्पाकडे वळवण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. यातून ही कारवाई करण्यात आली. मात्र, त्यातून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ईडीनं थेट ही कारवाई केल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

दरम्यान, या सर्व घडामोडी घडल्यावर आता मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. तपास यंत्रणांचा वापर करुन राज्यातील महाविकास आघाडीचे अस्थिर करण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे त्यावरआता वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. पण माझं मत विचाराल तर मी माझ्या पोरीला महाराष्ट्रात ठेवणार नाही असं वक्तव्य राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

मी अगदी स्पष्टपणे सांगतो, कोणी बोलो अथवा नाही पण भीती ही माणसाला खात असते. रात्री तीन वाजता टक् टक् झालं तर हार्ट अटॅक येण्याचीच शक्यता असते,” असं उत्तर दिलं. असं वाटतं का ईडी येतंय? यावर “आता कोणाच्या ध्यानी, मनी स्वप्नीच नाही ना कोणाच्या घरी कोण घुसेल. यात सर्वात जास्त हाल होतात ते अशा माणसांचे ज्यांचा तुमच्या राजकारणाशी काही संबंध नसतो,” असं आव्हाड म्हणाले.

दरम्यान, आव्हाडांच्या या विधानानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी आव्हाडांच्या विधानावरून थेट आदित्य ठाकरेंना जाब विचारला आहे. “स्वत: मंत्री पदावर बसलेली व्यक्ती महाराष्ट्राबद्दल असं गंभीर वक्तव्य करत असेल आणि जगभरात आणि देशभरात महाराष्ट्र हे बिकट परिस्थितीत चाललेलं राज्य आहे असा प्रचार करत आहेत, तर हा महाराष्ट्र द्रोह नाही तर काय आहे? यावर आदित्य ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी”, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.