भाजपा त्यांची मळमळ दुसऱ्याच्या भोंग्यातून बाहेर काढत असल्याचं स्पष्ट दिसत आहे – संजय राऊत

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS ) गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park)पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मशिदींवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांवर भाष्य केलं.

ते म्हणाले, ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर दुप्पट आवाजात स्पीकर लावायचे आणि हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशांत दिसतात का? प्रार्थनेला माझा विरोध नाही. मशिदीवर लागलेले भोंगे खाली उतरावावे, हा निर्णय सरकारने घ्यावा. निर्णय नाही घेतला तर मशिदीसमोर हनुमान चालीसाचे स्पीकर लावावे. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे.

दरम्यान, आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या याच मुद्द्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, शिवतीर्थावरचा भोंगा भाजपाचा होता तसंच अक्कलदाढ उशिरा येते हे काल महाराष्ट्राला दिसलं असा टोलाही लगावला.

“काल त्यांनी मराठीभाषा भवनचं स्वागत करायला हवं होतं. महाराष्ट्राच्या राजधानीत इतकं मोठं कार्य घडलं आहे. त्याच्याविषयी काही बोलले नाहीत. फक्त टीका केल्याने काय मिळतं?आहे ते देखील गमवून बसाल,” असा सल्ला संजय राऊतांनी दिला. भाजपा त्यांची मळमळ दुसऱ्याच्या भोंग्यातून बाहेर काढत असल्याचं स्पष्ट दिसत आहे असा आरोप यावेळी त्यांनी केला.