पवार साहेबांसारखे नेतृत्व आपल्या पक्षाला मिळालेले आहे हे आपले भाग्य आहे – भुजबळ

पुणे  :- फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करतो. त्यामुळे समाजातील तळागाळातील नागरिकांना जवळ करून त्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे. तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन कार्यकर्त्यांनी पक्ष वाढविण्यासाठी काम करण्याचे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नूतन मध्यवर्ती कार्यालयास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते अंकुशराव काकडे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप,ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, माजी आमदार कमलताई ढोले पाटील, महापालिका विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जिल्हा तसेच तालुका पातळीवर पक्षाचे कार्यालय व्हावे या कार्यालयात विचार विनिमय व्हावा नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावे अशी पवार साहेबांची इच्छा आहे. त्यादृष्टीने पक्ष कार्यालयाची अद्ययावत अशी उभारणी करण्यात आली आहे. पक्षातील कार्यकर्त्यांसाठी हे महत्वाचे व्यासपीठ असून या व्यासपीठावरून सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवावे असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, पवार साहेबांसारखे नेतृत्व आपल्या पक्षाला मिळालेले आहे हे आपले भाग्य आहे. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला नेहमीच मिळत असते त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. समाजातील प्रत्येक घटकाला नेतृत्व करण्याची संधी द्यावी.कार्यकर्त्यांनी मनापासून लोकांची सेवा करावी. लोकांना लढणारी माणसं आवडतात, रडणारी आवडत नाही असे सांगत स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडविले तर निवडणुकीत यश नक्कीच आहे असे ते यावेळी म्हणाले.

ते म्हणाले की, लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेले आहे. कुठे चुकत असेल तर बोलले पाहिजे योग्य असेल त्याला पाठिंबा दिला पाहिजे. पक्षाचे किती लोकप्रतिनिधी आहेत यावर पक्षाचे ताकद समजली जाते. त्यामुळे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.