यह तो सिर्फ अंगडाई है… अब महाराष्ट्र की बारी है !, चित्रा वाघांचं सूचक ट्विट

मुंबई : उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे. याबरोबरच काही पोटनिवडणुकांचीही मतमोजणी आज होणार असून मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिद्धू, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतमोजणीत स्पष्ट झाले आहे.

पाच राज्यामध्ये भाजपची जोरदार कामगिरी पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. पंजाब वगळता अन्य चार राज्यांमध्ये भाजपचे उमेदावर आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. पंजाबमध्ये जनतेनं काँग्रेसला नाकारल्याचे चित्र दिसत आहे. अद्याप संपूर्ण निकाल हाती आले नाहीत. उतर उत्तर प्रदेशसह, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या चार राज्यांमध्ये भाजपने चांगलीच मुसंडी मारली आहे. या चारही राज्यात भाजपला मोठी आघाडी मिळाली आहे.

या निकालाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटायला सुरवात झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी १० मार्च नंतर महाराष्ट्रात भाजपचे सरकार बनेल असं विधान केले होते. त्यानंतर आता या निकालानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील अशाच प्रकारचं सूचक ट्विट केलं आहे. ‘अकेला देवेंद्र क्या करेगा पुछनेवालों को.. फिर एक बार करारा जवाब… यह तो सिर्फ अंगडाई है….अब महाराष्ट्र कि बारी है….जय हो…..विजय हो…’ अशा आशयाचे ट्विट वाघ यांनी केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात नवे नाट्य पाहायला मिळतात का ?, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.