‘महाविकास आघाडीतील मंत्री भेदरले आहेत, म्हणूनच फडणवीस यांच्यावर सूड बुद्धीने गुन्हा दाखल केला’ 

 पुणे  : राज्य सरकार मधील मंत्र्यांचा भ्रष्टाचार पुराव्यानिशी बाहेर काढल्याने भयभीत झालेल्या महाविकास आघाडीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सूडबुद्धीने आणि बेकायदेशीरपणे गुन्हा दाखल केला आहे. ही कृती लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारी असून, भाजपच्या वतीने आम्ही सरकारचा तीव्र निषेध करतो, सरकारने गुन्हा मागे घेतला नाही तर तीव्र जनआंदोलन करू असा इशारा शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला.

मुळीक यांच्या नेतृत्वाखाली महविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. आमदार योगेश टिळेकर,महापौर मुरलीधर मोहोळ, प्रभारी धीरज घाटे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येणपुरे, दिपक नागपुरे, दिपक पोटे, दत्ताभाऊ खाडे, सुशील मेंगडे, प्रमोद कोंढरे, रवि साळेगावकर यांच्यासह नगरसेवक व पदाधिकरी उपस्थित होते.

मुळीक पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि अनैतिकतेचे गंभीर आरोप होत आहेत. विविध न्याय व्यवस्थांचा तपासात त्याला पुष्टी ही मिळत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येकी एक मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. दोन मंत्री तुरुंगात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारी आणि देशद्रोही व्यक्तींच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील मंत्री भेदरले आहेत. म्हणूनच फडणवीस यांच्यावर  सूड बुद्धीने गुन्हा दाखल केला आहे.