कॉंग्रेसमध्ये भूकंप : एकदोन नव्हे तब्बल ६४ नेत्यांनी दिला राजीनामा 

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu – Kashmir) माजी उपमुख्यमंत्र्यांसह ६४ जणांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तारा चंद (Tara Chand) म्हणाले की, काँग्रेस हायकमांड कोणाचेही ऐकत नाही. जो प्रकल्प लोकांपर्यंत पोहोचवायचा होता तो पक्ष करू शकला नाही. त्यामुळेच आज आम्ही पक्ष सोडला असून आता गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्यासोबत राहणार आहोत.

तारा चंद यांच्याशिवाय माजी मंत्री चौधरी घरुराम, अब्दुल मजीद वाणी, मनोहर लाल शर्मा, माजी आमदार बलवान सिंह यांच्यासह अनेक बडे नेते आणि कार्यकर्त्यांनीही पक्ष सोडला आहे. यापूर्वी जम्मू-काश्मीर विधानसभेचे माजी उपसभापती गुलाम हैदर मलिक (Ghulam Haider Malik) यांच्यासह चार काँग्रेस (Congress) नेत्यांनी आणि पक्षाच्या १२ प्रमुख कार्यकर्त्यांनीही काँग्रेस सोडण्याची घोषणा केली होती.

विशेष म्हणजे काँग्रेसचे माजी आमदार मलिक आणि विधान परिषदेचे दोन माजी सदस्य सुभाष गुप्ता आणि शामलाल भगत यांनी कठुआच्या बानी विधानसभेतून आपले राजीनामे पार्टी हायकमांडकडे पाठवले आहेत. तसेच डोडा येथील त्यांच्या पक्षाच्या 12 कार्यकर्त्यांनीही पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन आझाद यांना पाठिंबा दर्शवला. यामध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष असगर हुसेन खांडे, जिल्हा सरचिटणीस वीरेंद्र कुमार शर्मा आणि जिल्हा उपाध्यक्ष (महिला युनिट) प्रमिला शर्मा यांचा समावेश आहे.