भारतीय संघाची चिंता मिटली! जसप्रीत बुमराहबद्दल आली मोठी Good News

भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बातमी पुढे आली आहे. भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या पाठीची सर्जरी (Jasprit Bumrah Back Surgery) पूर्ण झाली असून तो कधी पुन्हा मैदानावर उतरेल, याबाबत माहिती समोर आली आहे.

भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज बुमराह गेल्या वर्षी सप्टेंबरपासून मैदानाबाहेर आहे. त्याला टी20 विश्वचषकातही खेळता आले नव्हते. मात्र तो पुन्हा मैदानात परतण्याच्या तयारीत आहे. न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्चमध्ये बुमराहच्या पाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता त्याला बरे होण्यासाठी जास्तीत जास्त 24 आठवडे लागू शकतात. ऑगस्टपासून तो पुन्हा नेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी उपलब्ध होईल. त्याचं पुनरागमनही महत्त्वाचं आहे, कारण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वनडे विश्वचषकाचे सामने भारतात खेळवले जाणार आहेत. 2011 पासून संघ विश्वविजयाची वाट पाहत आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, न्यूझीलंडचे सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. रोवन स्केटेल यांनी बुमराहच्या पाठीची शस्त्रक्रिया केली. यापूर्वी त्यांनी जेम्स पॅटिनसन, जेहान बेहरेनडॉर्फ आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांच्यावरही उपचार केले आहेत. मात्र, जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबाबत बीसीसीआयकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. पण सूत्राने सांगितले की, तो ऑगस्टपासून गोलंदाजी सुरू करू शकतो.

असे असले तरीही, बुमराह शस्त्रक्रियेमुळे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या वनडे आशिया चषक स्पर्धेत खेळू शकणार नाही. जर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला तर बुमराहला त्यात प्रवेश करता येणार नाही. 7 जूनपासून इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया आधीच फायनलसाठी पात्र ठरला आहे. 9 मार्चपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव केल्यास ते विजेतेपदाच्या फेरीत आपले स्थान निश्चित करतील.