Rupali Chakankar – सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात चार वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सांगितले. आज उमदी पोलीस ठाणे येथे पोलीस तपासाचा आढावा घेतल्यानंतर पीडित कुटुंबाची चाकणकर यांनी भेट घेतली.
सांगलीच्या जत मध्ये ५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीने अत्याचार केला. यामध्ये पीडित मुलगी मयत झाली. आरोपीने तिचा मृतदेह लपवून ठेवला होता. दरम्यान मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीसांनी तातडीने केलेल्या तपासात सदर दुर्दैवी घटना उघडकीस आली होती.
आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी जत मधील उमदी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस उपायुक्त यांच्याकडून या प्रकरणातील तपासाचा आढावा घेतला. १५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालेल असे चाकणकर यांनी यावेळी सांगितले. आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही दूरध्वनीद्वारे पोलिसांना जलद तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.
पोलिसांकडून आत्तापर्यंत झालेल्या कारवाईचा आढावा घेतल्यानंतर चाकणकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजना तसेच मुख्यमंत्री सहायता निधीमधून तातडीने भरीव मदत मिळवून देण्यासाठी देखील चाकणकर यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
या आधी राज्य महिला आयोगाने कोल्हापूर मधील खोची, मावळ मधील कोथुर्णे आणि वेल्हा मधील कातकरी समाजातील अल्पवयीन मुलींच्या अत्याचार प्रकरणात खटला जलद गतीने चालावा तसेच आरोपींना फाशीचे शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा केला होता. या तिन्ही घटनेतील आरोपींना मा. न्यायालयाने फाशीची सुनावली होती. त्याच धर्तीवर जत मधील प्रकरणाचा तपास जलद व्हावा, खटला योग्यरीतीने चालावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आयोगाकडून पाठपुरावा करण्यात येईल असे चाकणकर म्हणाल्या.