अजितदादांच्या कानात काही सांगण्यापेक्षा ग्राऊंडवर काम करा, जयंत पाटलांनी केली कानउघडणी

सोलापूर : राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाच्या दुसऱ्या दिवशी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूर ग्रामीण मतदारसंघाचा आढावा घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हलवून जागं करण्यासाठी हा परिवार संवाद दौरा आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक जिल्हा, तालुका, गाव, शहर फिरून तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहोत, असे जयंत पाटील म्हणाले.

तर, सोलापुरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबई, पुण्याला येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानात काही तरी सांगण्यापेक्षा ग्राऊंड लेव्हलला राहून काम करावे. ग्राऊंड लेव्हलला राहून काम केले तरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत होईल, असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिला.

सोलापुरातील सुशील रसिक सभागृहात झालेल्या ग्रामीण राष्ट्रवादीच्या परिवार संवाद कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते. ‘माझ्या बोलण्याने कोणाला वाईट वाटले असेल, तर मला फरक पडत नाही; कारण मी खर बोलतो, करेक्ट बोलतो,’ असे सांगत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची चांगलीच कानउघडणी केली.

दरम्यान, आपल्याला २०२४ ची विधानसभा निवडणूक जिंकायचीच आहे, मात्र २०२९ साठी पक्षाची मजबूत बांधणी आपल्याला आतापासूनच करावी लागेल. त्यासाठी तरूणांचे जाळे राज्यभरात निर्माण करा. राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष बनवायचे असेल तर सोलापूरात आपल्याला मिळालेली प्रत्येक सीट निवडून आणा. बीड, नाशिक जिल्ह्यांनी जास्त आमदार दिले आहेत त्याचप्रमाणे सोलापूरही सर्वात जास्त आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देऊ शकतो. त्यापद्धतीने पावले टाका, बुथ कमिट्यांवर लक्ष केंद्रित केल्यावर आपल्याला हे यश मिळेल, असे मार्गदर्शन त्यांनी केले.