महाराष्ट्र बंदच्या घोषणेमुळे सहन न झाल्याने भाजपकडून अजितदादांवर कारवाई – जयंत पाटील

मुंबई : आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं कारस्थान भाजपाने सुरू केलं असून भाजपाने राष्ट्रवादीचा धसका का घेतला आहे हे विचार करण्यासारखं आहे अशी खोचक टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.

आमचा कायद्यावर विश्वास आहे. छगन भुजबळ यांनाही असाच त्रास देण्याचा प्रयत्न झाला मात्र ते निर्दोष सुटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते निर्दोष आहेत. कोणताही गैरव्यवहार त्यांच्याकडून झालेला नाही तरीही त्यांना बदनाम करणं हाच यामागचा हेतू आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

आजपासून राज्यातली धार्मिक स्थळे दर्शनासाठी उघडली गेली असून सकाळी मुंबईतील सिध्दीविनायक मंदिरात दर्शन घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

धाड टाकली जाणार किंवा कारवाई केली जाणार हे भाजपच्या नेत्यांना आधी कळतं त्यामुळे या देशातल्या सर्व तपास यंत्रणा भाजप चालवत आहे यावर आता जनतेचा विश्वास बसला आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

अजित पवारांनी कशाचीच कागदपत्रं कधी दडवली नाहीत. मग जाहीर करण्याचा प्रश्च येत नाही. त्यामुळे अजित पवारांना दडवण्यासारखं काहीच नाही. ते कधीही दडवत नाहीत असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

लखीमपूर येथे ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली. जालियनवाला बागेपेक्षा क्रूर कृत्य तिथे केले गेले होते. या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडी ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पाळत आहे. भाजपला हे सहन झाले नसेल म्हणून ही कारवाई करण्यात आली असेल असाही आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

हे देखील पहा