‘बारामतीतील शेतकरी गायींसह सीमाभागात अडकलेत; त्यांची सुटका करण्यासाठी तात्काळ प्रयत्न करा’

मुंबई – बारामतीतील काही लोकं गायी घेण्यासाठी कर्नाटकच्या सीमेलगत गेले असता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाड्या अडवून पैशाची मागणी केली आहे. यात १६० गायी गाभण आहेत. त्यांना चारा पाणी वेळेवर मिळत नाही. लोकांना जेवण मिळत नाही. महाराष्ट्र सरकारने त्वरित या शेतकऱ्यांना सोडवून महाराष्ट्रात परत आणावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सभागृहात केली.

एका आरपीआय कार्यकर्त्यांने त्यास विरोध केला असता त्यांच्यात भांडण होऊन हे प्रकरण पोलिसांकडे गेले. वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते स्थानिक भाषेत लिहिलेले असल्याने काही समजायला मार्ग नाही. त्या भागात असंख्य राज्यातील लोकं गायी-शेळ्या विकत घ्यायला येतात. मात्र महाराष्ट्रालाच हीन वागणूक का दिली जाते? असा संतप्त सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत पुन्हा गरळ ओकली असून सीमा भागात ८६५ गावांना महाराष्ट्राने योजना पुरविणे ‘हा न माफ करता येण्यासारखा गुन्हा’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमच्या लोकांना योजना पोहोचविण्यासाठी जर ते अडवणूक करत असतील तर ते योग्य नाही असेही जयंत पाटील यांनी सरकारला खडसावले.

महाराष्ट्र सरकारच्या विरोधात सातत्याने अपशब्द वापरण्याचे काम कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून केले जात आहे, त्याचा जयंत पाटील यांनी सभागृहात निषेध केला. शिवाय निवडणूक जवळ येत असताना महाराष्ट्र विरोधी भूमिका घेत आगपाखड करणाऱ्या कर्नाटक सरकारची गांभीर्याने दखल घ्यावी अशी सूचनाही जयंत पाटील यांनी सरकारला केली.