मला वाटत नाही राज ठाकरे यांना धोका आहे – जयंत पाटील 

मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी सुरु असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशात मात्र त्यांना रोखण्याची तयारी सुरु झाली आहे. उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागितल्यशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा देत भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंह (BJP MP Brijbhushan Sharan Singh) यांनी दिला आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांना  धमकीचं एक पत्र आलं आहे. या पत्राच्या माध्यमातून नांदगावकर आणि राज ठाकरे यांना धमकी देण्यात आली आहे.

दरम्यान, या घडामोडींवर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांनी भाष्य केले आहे.  राज ठाकरे यांना कोण कशाला इजा करेल. मला वाटत नाही राज ठाकरे यांना धोका आहे पण त्यांना भीती वाटत असेल तर संरक्षण (Protection) दिले पाहिजे. आमची कोणतीही तक्रार नाही असे स्पष्ट मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

अलीकडे राज्यात नवीन फॅशन (New Fashion) सुरू झाली आहे केंद्रसरकारमधूनच संरक्षण पुरवलं जातं आणि त्यातच दोन – तीन उदाहरणे झाली आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केंद्रसरकार राज्यातील व्यक्तींना संरक्षण देत आहे. त्यामुळे तुमची भाजपबरोबर (BJP) चांगली मैत्री असेल तर तुम्हालाही संरक्षण देण्याची व्यवस्था होऊ शकते असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.