शिवाजी महाराजांना देवत्व देऊ नये – जितेंद्र आव्हाड

पुणे :   गांधी परिवार, काँग्रेसला त्यागाची मोठी परंपरा आहे. काँग्रेसची विचारधारा ही प्रेमाची, आपलेपणाची आहे. देशाला एकसंध ठेवण्यात भारतीय संविधान आणि काँग्रेसची हीच विचारधारा आवश्यक आहे. आज द्वेषाने विखुरलेल्या देशाला जोडण्याचे काम राहुल गांधी भारत जोडो पदयात्रेतून करत आहेत, असे प्रतिपादन माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.

सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित १८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे उद्घाटन आव्हाड यांच्या हस्ते झाले. यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले,  काँग्रेसच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचा माणूस असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मात्र, संविधान वाचवण्यासाठी मिळालेल्या कोणत्याही व्यासपीठावर आपण बोलले पाहिजे. हृदयाची आणि प्रेमाची भाषा, संवाद गरजेचा आहे. आज राहुल गांधी तेच करत आहेत. स्वत्व विसरून काम करणाऱ्या राहुल गांधींचा त्याग आपण लक्षात घ्यायला हवा. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी जो त्याग केला, त्याच वाटेवर राहुल गांधी चालत आहेत. लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे काम ते करत असल्याने त्यांच्याविषयी जनतेमध्ये प्रेम, आस्था आहे. आपल्या पित्याच्या खुन्यांना क्षमा करण्याची त्यागभावना केवळ राहुल गांधींकडे आहे.

हा देश महात्मा गांधींचा आहे आणि त्या देशाची सद्भावनेची संस्कृती आहे. मात्र, गांधींना मारणाऱ्या त्याच नथुरामचे इथे होणारे उदात्तीकरण दुर्दैवी आहे. इतिहासाचे विकृतीकरण आणि वर्ण वर्चस्ववादाचा प्रसार करण्याचा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे. चित्रपटांच्या माध्यमातून आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर होणार हल्ला आपण सहन करता कामा नये. शिवाजी महाराजांना देवत्व देऊ नये, त्यांचा कार्याचा आदर्श ठेवून काम करायला हवे. गांधी-आंबेडकर यांच्यातील संबंध खूप चांगले होते. त्यांच्यात मतभेद जरूर होते. मात्र, देशहितासाठी त्यांनी कायम एकत्रित काम केले. खरा इतिहास आपण नव्या पिढीला सांगितला पाहिजे. गांधी-नेहरू-आंबेडकर या तिघांनी दूरदृष्टीने देशाची रचना केली. अनेक संस्था निर्माण केल्या. इंदिरा गांधींनी देशाला सक्षम केले. काँग्रेसच्या विचारधारेतून हे सगळे झाले आहे. त्यामुळे काँग्रेसने काय केले? हा प्रश्न विचारणाऱ्यांनी उघड्या डोळ्यांनी इतिहास पाहावा, असे स्पष्ट मत जितेंद्र आव्हाड यांनी मांडले.

राज ठाकरे जातीद्वेष पसरवणारे
जाती धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवण्याचे काम राज ठाकरे यांच्याकडून वारंवार केले जात आहे. मग ते इतिहासाचे दाखले देऊन असो की, भोंग्याचा प्रश्न उपस्थित करून. शरद पवार यांनी कधीही जाती-धर्मात द्वेष पसरवण्याचे पाप केले नाही. समाजातील सर्व घटकांना एकत्रित घेऊन चालण्याची काँग्रेसची आणि शरद पवार साहेबांची विचारधारा आहे, असे कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.