‘शिक्षणसंस्था चालवायला अक्कल लागते’, जितेंद्र आव्हाडांनी काढली शिवसेना आमदाराची अक्कल

पुणे : साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावरून जोरदार वाद पेटला आहे. कोरेगाव विधानसभेचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यावरून कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी थेट पवार घरण्यावरच निशाणा साधला आहे. रयतचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घटना लिहली होती. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा रयतचा अध्यक्ष असला पाहिजे, अशी भूमिका होती. मात्र काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ती घटना बदलली,असल्याचा घणाघाती आरोप महेश शिंदे यांनी केलाय.

रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण होता कामा नये. ज्या लोकांची पात्रता नाही त्या लोकांना रयतच्या बॉडीवर घेतलं जातं याचे दुःख वाटत असल्याचे आमदार शिंदे म्हणाले.खासदार उदयनराजे भोसले यांना रयतच्या बॉडीवर घेतले नाही, ही संपूर्ण महाराष्ट्राची खदखद आहे.राजकीय ताकद असल्याने ही संस्था ताब्यात गेली असून हे चुकीचे आहे. असं महेश शिंदे म्हणाले आहेत.

माझी उंची 6 फूट असून शरद पवारांची उंची माझ्यापेक्षा 2 इंचाने मोठी आहे. पवारांनी वंशपरंपरागतीने पुढील पिढीला रयतचे अध्यक्षपद दिल्यास रयत संस्थेसाठी फार मोठा धोका निर्माण होईल. ज्यांना समाजातील कसलीच जाण नाही अश्यना या संस्थेवर घेतल्याची टीका करत जनतेचा विचार करून पवार साहेब रयतचे अध्यक्षपद सोडतील, असं खोचक वक्तव्य शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केले आहे.

महेश शिंदे यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पवारसाहेबांवर वैयक्तिक टीका करुन आपण फार कर्तृत्ववान आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. कुठल्या गावातला कोण महेश शिंदे यांची गौरी शंकर नावाची शिक्षण संस्था आहे. काय झालं या शिक्षण संस्थेत? क्लार्क, प्राध्यापकांचा पगार नाही. विद्यार्थ्यांच्या फी बाबत अतापता नाही. तुम्ही घेतलेल्या साखर कारखान्याचं काय झालं ओ? शिक्षणसंस्था चालवायला अक्कल लागते. घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

तर, ‘तुम्ही शरद पवार यांच्या उंचीच्या फक्त 2 इंच कमी आहात, असं तुम्ही तुमच्या वक्तव्यात म्हटलं आहे. शरद पवार हे उंचीमुळे ओळखले जात नाहीत, तर त्यांच्या कर्तृत्वामुळे ओळखले जातात. रयत शिक्षण संस्था ज्या उद्देशानं बनवली होती, बहुजनांच्या हितासाठी. तिचा ज्या पद्धतीने फैलाव झाला. ज्या पद्धतीने तिची पाळमुळं गाव खेड्यापर्यंत पोहोचली, त्यामागे फक्त पवारसाहेब आहेत. तेव्हा ज्या माणसाबाबत आपण बोलत आहोत, त्याच्यासमोर आपलं कर्तृत्व किती आहे, हे कधीतरी तपासा.’ असा थेट हल्ला आव्हाड यांनी महेश शिंदे यांच्यावर केला आहे.

दरम्यान, बोलायचं म्हणून तुम्ही खूप बोलू शकता, बोलायला तुम्हाला कुणीच अडवू शकत नाही. फक्त स्वत:ची लाज स्वत:च्या हाताने घालवू नका. तुम्ही उंचीने किती मोठे आहात याच्याशी काही देणघेणं नाही. फक्त तुमचा मेंदू कुठे आहे ते एकदा तपासून पाहा, अशी घणाघाती टीका जितेंद्र आव्हाड यांनी आमदार महेश शिंदे यांच्यावर केलीय.