अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानसोबत पार्टी काढणारे जोगेद्र कवाडे आता एकनाथ शिंदेंसोबत

Mumbai – पीपल्स रिपब्लिकन पक्ष (Peoples Republican Party) आणि बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) पक्षाची अखेर युती झाली आहे. मुंबईत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि प्रा. जोगेंद्र कवाडे (Prof. Jogendra Kawade) यांनी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीने प्रभावित होऊनच आम्ही युतीचा निर्णय घेतला आहे. गोरगरीबांच्या वंचितांच्या हक्कासाठी ही युती काम करेल,” असं प्रा. जोगेंद्र कवाडे यावेळी म्हणाले. दरम्यान, या युतीची घोषणा होताच आता अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानचे नाव देखील चर्चेत आले आहे.

मुंबई तकने दिलेल्या वृत्तानुसार, जोगेंद्र कवाडे यांच्या राजकीय कारकीर्दीत मुंबईतला डॉन हाजी मस्तानसोबत पक्ष काढला होता, त्यांचं नाव होतं, दलित-मुस्लीम सुरक्षा महासंघ. जोगेंद्र कवाडे हे या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते, तर हाजी मस्तान सहअध्यक्ष होता. दोघांनी मिळून लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका लढल्याचं स्वतः जोगेंद्र कवाडे सांगतात.

त्यावेळी हिंदू-मुस्लीम मतांची व्होट बँक एकत्र आणून काँग्रेसला धक्का द्यायचा, अशी त्यांची रणनिती होती. याच रणनितीवर लढलेली १९८४ सालची औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातली निवडणूक चांगलीच गाजली होती. या निवडणुकीत कवाडे आणि हाजी मस्तानच्या उमेदवारानं तब्बल ४० हजार मतं घेतली होती. त्यामुळे राजीव गांधी यांचा उमेदवार पराभूत झाला होता.