कोविड महामारीचे निवडणुकीत भांडवल करू नका; जोशुआ डिसोझा यांचे सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन

म्हापसा – गोव्यात सध्या राजकीय वातावरण तापले असून एकमेकांवर टीका करताना राजकीय पक्षांकडून कोविड महामारीवरून देखील चिखलफेक होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महामारीचे भांडवल करू नका, असे आवाहन म्हापसाचे भाजपा उमेदवार जोशुआ डिसोझा यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केले आहे.

संपूर्ण जगाने कोविड-१९ महामारीची भयंकरता अनुभवली आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात- कुटुंबातील एकतरी व्यक्ती या रोगाने बाधित झाली आहे. कोविडची पहिली लाट, लॉकडॉउन त्यानंतर दुसरी लाट आणि आता तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आपण आहोत. कुणी आपली आई गमावली आहे, तर कुणी वडील, कुणी भाउ, कुणी बहीण, तर कुणी आपल्या मुलाला गमावले आहे. कुणी आपला नातेवाईक, कुणी शेजारी या महामारीत मृत्यूमुखी पडलेला पाहिला आहे.

या कोविड महामारीच्या काळात आपण सर्वजण संकटात होतो. प्रत्येकाने आपआपल्या परीने लोकांना मदत करण्यासाठी पुढकार घेतला आहे. आता गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतूने सर्वपक्षीय उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणार यात शंका नाही. पण, कोविड महामारीचे राजकीय भांडवल करु नये असे आवाहन डिसोझा यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केले आहे.

कोविड ही एक जागतिक आपत्ती होती. या आपत्तीचे भाडवल करणे, मानवतेला काळींमा फासण्यासारखे आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेते-पदाधिकारी यांना आवाहन करतो की, निवडणूक प्रचारासाठी कोविडसारख्या महामारीचा आधार घेवून मानवतेची चेष्टा करू नये असं देखील त्यांनी म्हटले आहे.