“लँडिंगच्या फक्त ८ मिनिटं आधी हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला, आणि…”, गृहमंत्र्यांनी लोकसभेत सांगितला घटनाक्रम!

नवी दिल्ली- सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाबाबत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज काही वेळापूर्वी प्रथम लोकसभेमध्ये आणि नंतर राज्यसभेमध्ये निवेदन केलं. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

जनरल रावत पूर्वनियोजित दौऱ्यावर होते. ते त्यासाठी वेलिंग्टन इथं पोहोचण्यापूर्वीच त्यांना घेऊन जाणारं हवाई दलाचं एम आय 17 हे हेलिकॉप्टर कोसळलं. त्यामधील 14 पैकी 13 जण मृत्युमुखी पडले असून एकमेव जीवित ग्रुप कॅप्टन वरूण सिंह यांच्यावर उपचार सुरू आहेत. रावत यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंतिम संस्कार केले जातील, असं सांगत राजनाथसिंह यांनी सर्व दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर दोन्ही सदनाच्या पीठासीन अध्यक्षांनी सदस्यांच्या वतीनं ठरावाचं वाचन करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी राजनाथ सिंह यांनी नेमकं अपघातावेळी काय घडलं, याविषयी देखील लोकसभेत सविस्तर माहिती दिली.ते म्हणाले, हेलिकॉप्टरचा उड्डाण कालावधी अवघा २७ मिनिटांचा होता. ११ वाजून ४८ मिनिटांनी हेलिकॉप्टरनं एअरबेसवरून उड्डाण घेतलं. हे हेलिकॉप्टर १२ वाजून १५ मिनिटांनी वेलिंग्टन येथे पोहोचणार होतं. पण सुलुल एअरबेसचा १२ वाजून ८ मिनिटांनी अर्थात उड्डाण घेतल्यानंतर २० मिनिटांनी हेलिकॉप्टरसोबतचा संपर्क तुटला आणि याच दरम्यान हा अपघात घडला.

यानंतर जंगलात काही स्थानिक लोकांना आग लागल्याचं दिसलं. ते धावत तिथे पोहोचले, तेव्हा त्यांना एका लष्करी हेलिकॉप्टरचे अवशेष आगीत जळत असलेले दिसले. बचाव पथकानं लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. जितक्या लोकांना वाचवणं शक्य होतं, त्यांना लागलीच वेलिंग्टनच्या मिलिट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या अपघातात १४ पैकी १३ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी माहिती राजनाथसिंह यांनी दिली.