कुठेतरी एक कडी मिसींग आहे;ज्योती मेटे यांनी व्यक्त केला विनायक मेटे यांच्या मृत्यूवर संशय

मुंबई – शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Death) यांचं नुकतेच पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर अपघाती निधन झालं. दरम्यान, आता विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूवर पत्नी ज्योती मेटे (Jyoti Mete) यांच्यासह अनेकांनी संशय व्यक्त केला आहे.

दरम्यान, दुसरीकडे मेटे यांच्या पत्नी ज्योती यांनी चालक अपघाताचं ठिकाण सांगत नव्हता असं म्हटलं आहे. सत्य लपवण्याचा प्रयत्न होतोय असं वाटतं असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. “अपघात झाल्याचं समजल्यानंतर तो नेमका कुठे झालेला आहे त्याचं ठिकाण मला कोणीही सांगत नव्हतं. ड्रायव्हरशी बोलण्याचा प्रयत्न केला. तो ते ठिकाण सांगू शकत नव्हता,” असं ज्योती यांनी म्हटलं आहे.

“तो ड्रायव्हर गेली काही वर्षं साहेबांसाठी (मेटेंसाठी) काम करत आहे. तो या मार्गावर सातत्याने साहेबांबरोबर प्रवास करतो,” असंही त्या चालकासंदर्भात माहिती देताना म्हणाल्या.“मी (रुग्णालयात) पोहोचल्यानंतर मला जी अपघाताची वेळ कळली होती त्या वेळेपेक्षा अगोदर साहेबांचा मृत्यू झालेला आहे हे मला लक्षात येत होतं. त्यामुळे कुठेतरी एक कडी मिसींग आहे. माझ्यापासून सत्य दडवलं जात आहे एवढं मला वाटतं होतं,” असंही ज्योती यांनी टीव्ही नाईन मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.