बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर कर्नाटकचे गृहमंत्री आक्रमक; म्हणाले, मुस्लीम गुंडांनी…

बंगरूळ – कर्नाटकमध्ये बजरंग दलाच्या २३ वर्षीय कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. रविवारी रात्री शिवमोग्गा जिल्ह्यात हर्षाची ही हत्या करण्यात आली. हत्येनंतर परिसरात तणाव असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती कॉलनीतील रवि वर्मा गल्लीत रविवारी रात्री उशिरा हर्षा नावाच्या 23 वर्षीय तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. त्याच्यावर अनेकवेळा चाकूने हल्ला झाल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, या हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याचवेळी या घटनेनंतर मृताच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून गोंधळ घातला. खबरदारी म्हणून पोलिसांनी शहरात कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

दरम्यान, आता या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपा आमने-सामने आले आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे.  गृहमंत्री के एस ईश्वरप्पा यांनी काँग्रेस पक्षाने उकसवल्यामुळे हत्या झाल्याचा आरोप केला आहे. “आमच्या पक्षातील एका चांगल्या कार्यकर्त्याची शिवमोग्मामध्ये हत्या झाली आहे. मुस्लीम गुडांनी हे केलं आहे. याआधी मुस्लिम गुंडांमध्ये इतकी हिंमत नव्हती. अशा लोकांविरोधात कडक कारवाई केली पाहिजे,” असं ते म्हणाले आहेत.

दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी यावेळी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. तपास सुरु असून आरोपींनी लवकरच अटक केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी ईश्वरप्पा यांच्या वक्तव्यावर बोलण्याचं टाळत तपासातून काय समोर येतं ते पाहिल्यानंतरच भाष्य करु असं म्हटलं आहे.