कालिचरण बाबा महाराष्ट्रातला आहे, ठाकरे सरकारने कडक कारवाई केली पाहिजे – वागळे

पुणे – छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आयोजित धर्मसंसद 2021चा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात आला आहे. याठिकाणी धर्मसंसदेच्या (Dharm Sansad 2021) शेवटच्या दिवशी कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरत देशाच्या फाळणीसाठी बापूंनाही जबाबदार धरलं. यानंतर कालीचरण यांच्यावर रायपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महात्मा गांधींना अकोल्याच्या कालीचरण महाराजांनी अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली आहे. यावेळी त्यांनी अत्यंत हीन दर्जाचे असे शब्द वापरले आहेत. कालिचरण महाराजाच्या या विधानामुळे आता बराच वाद पेटला आहे. कालिचरण महाराज हे फक्त गांधीजींना शिविगाळ करुन थांबले नाहीत तर गांधीजींची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेचेही त्यांनी आभार मानले आहेत. त्याच्या कृतीचं चक्क कौतुक केलं आहे.

यानंतर काँग्रेसच नाही तर अनेक सामाजिक, राजकीय व्यक्तींनी कालीचरण महाराजाविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केलीय. जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी देखील या मुद्द्यावर भाष्य केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, ही कसली धर्मसंसद? ही तर अधर्म संसद. द्वेषपूर्ण भाषणं करणाऱ्या विकृतांची जागा गजाआडच आहे. प्रश्न एवढाच आहे की कोणतं सरकार ही हिंमत दाखवणार? कालिचरण बाबा महाराष्ट्रातला आहे. ठाकरे सरकारने कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी देखील वागळे यांनी केली आहे.