महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालिचरण महाराजांच्या अखेर मुसक्या आवळल्या

नवी दिल्ली- राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजांना अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात ही अटकेची कारवाई कऱण्यात आली. छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी खजुराहो येथून कालीचरण महाराजांना अटक केली आहे.

बागेश्वरी धाम मधून पहाटे चार वाजता कालीचरण महाराजांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. कालीचरण महाराजांना दुपारपर्यंत रायपूरला आणण्यात येणार आहे. टिकारपारा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आयोजित धर्मसंसद 2021चा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात आला आहे. याठिकाणी धर्मसंसदेच्या (Dharm Sansad 2021) शेवटच्या दिवशी कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरत देशाच्या फाळणीसाठी बापूंनाही जबाबदार धरलं. यानंतर कालीचरण यांच्यावर रायपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महात्मा गांधींना अकोल्याच्या कालीचरण महाराजांनी अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली आहे. यावेळी त्यांनी अत्यंत हीन दर्जाचे असे शब्द वापरले आहेत. कालिचरण महाराजाच्या या विधानामुळे आता बराच वाद पेटला आहे.कालीचरण बाबाच्या संतापजनक वक्तव्याचे पडसाद राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले.