शिंदेसरकारवर कामाख्या देवीचा कोप; सरकार लवकरच गडगडणार – महेश तपासे

मुंबई – शिंदेसरकारवर कामाख्या देवीचा कोप असल्याने हे सरकार लवकरच गडगडणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या दर्शनासाठी त्यांच्या सहकारी आमदारांना घेऊन गेले आहेत त्यावर महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी जोरदार टीका केली आहे.

२९ नोव्हेंबरला सत्तांतर वादावर सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार असून या निकालानंतर १६ आमदारांचे निलंबन होणार आहे आणि त्यात स्वतः एकनाथ शिंदे आहेत त्यामुळे निलंबन झाल्या – झाल्या शिंदेसरकार गडगडणार आहे असेही महेश तपासे म्हणाले.

शिंदेसरकारकडून बळीराजाला ताकद देण्याचे काम झालेले नाही. शिवाय तरुणांना रोजगार मिळणारे राज्यातील प्रकल्प गुजरातला गेले तरीसुद्धा तरुणांच्या बाजुची भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली नाही उलट गुजरातला सहकार्य केल्याचे समोर आले आहे त्यामुळेच यंदा कामाख्या देवीचा आशिर्वाद नाही तर कोपाला सामोरे जावे लागणार आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.