कन्नड अभिनेता दर्शन (Kannada Actor Darshan) याची गणना सर्वात वादग्रस्त अभिनेत्यांमध्ये होते. तो नेहमी त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. अशातच रविवारी आपल्या आगामी ‘क्रांती’ चित्रपटाचे प्रोमोशन करण्यासाठी गेले असताना कन्नड स्टार दर्शनला प्रेक्षकाने चप्पल फेकून मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने दर्शनच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दर्शन आपल्या सिनेमाच्या टीमसह होसपेट या ठिकाणी उपस्थित होता. ‘क्रांती’ सिनेमातील गाणं लॉन्च करण्यासाठी सर्वजण जमले होते. तेथे चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. यादरम्यान एका प्रेक्षकाने अभिनेत्याला थप्पड मारण्याचा प्रयत्न केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की जेव्हा दर्शन जमलेल्या प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी स्टेजवर पोहोचला, तेव्हा गर्दीतून कोणीतरी त्याच्यावर चप्पल फेकून मारली. ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला.
मात्र प्रेक्षकाने फेकून मारलेली चप्पल दर्शनच्या तोंडाला नव्हे तर त्याच्या खांद्याला येऊन लागली. त्यानंतर दर्शनने राग व्यक्त न करता परिस्थिती सांभाळून घेतली आणि इतर प्रेक्षकांना शांत केले. अभिनेता दर्शनला चप्पल फेकून मारणारा प्रेक्षक कोण होता, हे अद्याप समजलेले नाही. परंतु दर्शनचे चाहते त्या प्रेक्षकावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
😣💔#WeStandWithDbosspic.twitter.com/zHXZhue0v9
— 👒GODZI (@NTR_VIJAY_GODZ) December 19, 2022
दर्शनला चप्पल फेकून मारण्यामागचे कारण काय?
दरम्यान या घटनेनंतर कन्नड अभिनेता दर्शनला प्रेक्षकाने चप्पल का मारली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दर्शनच्या नुकत्याच दिलेल्या ‘लेडी लक’वरील वक्तव्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे समजत आहे. दर्शनने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, भाग्याची देवी तुमचा दरवाजा वाजवत नाही, जर तिने दार वाजवलं तर तिला पकडून खोलीत ओढत न्या आणि तिथे तिचे सर्व कपडे काढा. या विधानामुळे लोक दर्शनवर प्रचंड संतापले असून ते अभिनेत्यावर जोरदार टीका करत आहेत.