इतरांचं सोडा, विश्वविजेता कर्णधारच म्हणतोय, ‘भारताचं सेमीफायनल गाठणंही कठीण’; पण का?

भारतीय संघाने (Team India) टी२० विश्वचषक २०२२ (T20 World Cup 2022) मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने पहिल्याच सराव सामन्यात डिफेंडिंग चँपियन ऑस्ट्रेलियाला मानहानिकारक पराभव दाखवला आहे. भारतीय संघ त्यांचा टी२० विश्वचषकातील पहिला सुपर-१२ सामना २३ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिद्वंद्वी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. यंदा भारतीय संघाला टी२० विश्वचषक विजयाचा प्रबळ दावेदार म्हटले जात आहे. परंतु विश्वविजेते भारतीय कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांचे मत काही वेगळेच आहे.

१९८३ साली भारतीय संघाला पहिल्यांदा विश्वचषक जिंकवून देणारे कपिल देव म्हणाले की, भारतीय संघ यंदा टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत जरी पोहोचला, तरी मोठी गोष्ट असेल. भारतीय संघाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या अपेक्षा फार कमी आहेत. भारतीय संघाच्या टॉप-४ मध्ये पोहोचण्याच्या शक्यताही केवळ ३० टक्के असल्याच्या कपिल देव यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी अशी भविष्यवाणी करण्यामागचे कारणही सांगितले आहे.

भारतीय संघातील अष्टपैलूंची कमतरता हे यामागचे प्रमुख कारण असल्याचे कपिल देव यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. लखनऊतील एका कार्यक्रमात बोलताना कपिल देव म्हणाले की, कोणत्याही क्रिकेट संघात धाकड अष्टपैलूंशिवाय आणखी काय पाहिजे. अष्टपैलू खेळाडू तुम्हाला फक्त विश्वचषकच नव्हे तर दुसऱ्या क्रिकेट स्पर्धा वा क्रिकेट मालिकाही जिंकून देतात. हार्दिक पंड्यासारखा क्रिकेटपटू भारतीय संघासाठी उपयोगी ठरेल. रविंद्र जडेजाही भारतीय संघातील गुणवंत अष्टपैलू आहे.

“आमच्या वेळी भारतीय संघात अष्टपैलूंची भरमार होती. टी२० क्रिकेटमध्ये एखादा संघ एखादा सामना जिंकतो, तर दुसरा सामना पराभूतही होऊ शकतो. अशात भारतीय संघाच्या विश्वचषक जिंकण्याच्या शक्यतांविषयी बोलणे निरर्थक असेल. सध्या बोलण्याचा मुद्दा हा असू शकतो की, भारतीय संघ टॉप-४ मध्ये जागा बनवू शकेल का? मी भारतीय संघाच्या टॉप-४ मध्ये पोहोचण्याच्या शक्यतांबद्दल चिंतित आहे. उपांत्य फेरीत पोहोचेपर्यंत काहीही सांगता येत नाही. मला तर वाटते की, त्यांच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या फक्त ३० टक्के शक्यता आहेत”, असे कपिल देव म्हणाले.