करमाळा : श्री कमलादेवी देवस्थानसाठी 4 कोटी निधी मंजूर

करमाळा – प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2021- 22 (Regional Tourism Development Scheme) अंतर्गत पुणे विभागातील नवीन कामांना 83 कोटी 54 लाख निधी मंजूर झाला असून त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील एकमेव करमाळा तालुक्यासाठी 4 कोटी निधी मंजूर झाला असून त्यापैकी दीड कोटी निधी जिल्हा परिषद सोलापूर कडे वर्ग झाला असल्याची माहिती करमाळा तालुक्याचे आमदार संजय शिंदे यांनी दिली. हा निधी मंजूर मंजूर करणेकामी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे ,राज्यमंत्री आदिती तटकरे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

देवीचामाळ हे ब वर्ग तिर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्रसाठी शिंदे ज्या वेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी भरीव निधी दिलेला होता. आमदार झाल्यानंतर त्यांनी पर्यटन विभागाकडून यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली.

या निधीमधून कमलादेवी मंदिराकडे जाणारे रस्ते सिमेंट काँक्रीट करणे व व पेविंग ब्लॉक बसवणे यासाठी 99. 80 लक्ष ,श्रीक्षेत्र कमला देवी मंदिराकडे जाणारे रस्ते डांबरीकरण करणे यासाठी 67. 64 लक्ष, श्रीक्षेत्र कमलादेवी मंदिर क्षेत्रास संरक्षक भिंत बांधणे यासाठी 148. 76 लक्ष,श्री. कमलादेवी मंदिरासाठी वाहनतळ करणे 90.40 लक्ष, कमलादेवी मंदिराकडे जाणारे रस्त्यासाठी स्ट्रीट लाईट बसवणे 15 लक्ष, कमलादेवी मंदिर यात्री निवास बांधने 80 . 54 लक्ष , कमलादेवी मंदिर क्षेत्र स्नानगृह, मुतारी बांधणे 21.72 लक्ष, मंदिर परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे 6 लक्ष ही कामे या निधीमधून होणार आहेत.

कमलाभवानी मंदिरास प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाल्यामुळे मंदिराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे. हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल देवीचामाळ ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी आमदार संजयमामा शिंदे यांचे आभार व्यक्त केले आहेत.