कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात; प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांचा झंजावाती प्रचार

Karnataka Assembly Elections – कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी रोड शो आणि जाहीर सभांना संबोधित करत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बेंगळुरूमध्ये त्यांचा दुसरा रोड शो करणार आहेत. NEET च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पंतप्रधानांचा आजचा रोड शो सहा ते आठ किलोमीटरच्या अंतराचा असेल.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बेळगाव, चिक्कबल्लापुरा आणि दोड्डाबल्लापूर इथं रोड शो आणि बागलकोटमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. केंद्रीय मंत्री एस जयशंकर आणि व्ही के सिंग म्हैसूर आणि कोडागु इथल्या समुदायाशी संवाद साधतील. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी बागलकोट आणि दावणगेरेमध्ये रोड शो करणार आहेत. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज विजयनगर आणि बल्लारी जिल्ह्यात प्रचार करणार आहेत.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालही बंगळुरूमध्ये मेगा रोड शो केला आणि दोन प्रचार सभांना संबोधित केलं. पंतप्रधानांचा २६ किलोमीटरहून अधिक अंतराचा रोड शो कालच्या दिवसाचा आकर्षण ठरला. पंतप्रधानांना बघण्यासाठी नागरिकांनी रस्त्यांच्या दुतर्फा मोठी गर्दी केलीहोती. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी काल हुबळीमध्ये एका प्रचार सभेला संबोधित केलं तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेळगाव आणि चिक्कोडी मध्ये दोन जाहीर सभांना संबोधित केलं.